नाशिक : रस्त्यावरील मुलांना रोजीरोटीचा प्रश्न असतो, शिक्षण हा तर दूरचा भाग. मात्र अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांचे भोजन आणि निवासाचा खर्च उचलण्याची सर्व जबाबदारी नाशिक महापालिकेचा महिला व बाल कल्याण विभाग करीत असून, त्यासाठी या मुलांचे लवकरच सर्वेक्षण करण्यात येणार आहे. नाशिक शहरात भिकारी आणि भिक्षेकऱ्यांच्या बरोबरच अनेक लहान मुले असतात. याशिवाय सिग्नलवर भिक मागणारी मुले चौकाचौकांत आढळतात. याशिवाय रस्त्यावर फुगे, खेळणी आणि फुलांचे गजरे विकणारी मुलेदेखील आढळत असतात. अशा मुलांसाठी वेगवेगळ्या योजना असल्या तरी सध्या तरी मुलांची अशी वाढती संख्या ही चिंताजनक ठरली आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने आता अशा मुलांचे सर्वेक्षण करून त्यांचे वय, शिक्षण, एक पालक आहे की द्वीपालक अशाप्रकारच्या माहितीचे खासगी सेवाभावी संस्थेच्या मदतीने सर्वेक्षण करण्यात येणार असून त्यानंतर ही माहिती मिळवल्यानंतर त्यांना निवारा, भोजन आणि शिक्षण अशाप्रकारची सुविधा देण्यात येणार आहे. नाशिक महापालिकेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने हे नियोजन करण्यात आले आहे. महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीसाठी एकूण अंदाजपत्रकाच्या पाच टक्के निधी राखीव असतो. बहुतांशी निधी महिला प्रशिक्षणावर खर्च होतो अथवा व्यपगत होतो, त्या पार्श्वभूमीवर याच निधीतून ही योजना राबविली जाणार आहे.
रस्त्यावरील मुलांना आणणार शिक्षणाच्या प्रवाहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 1:47 AM