प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नाना पटोले यांचा तसा हा पहिलाच दौरा होता व या पहिल्या वहिल्या दौऱ्यालाच नाशिकमध्ये दृष्ट लागली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा हिरमोड होणे स्वाभाविक असले तरी, नाशिक शहर व जिल्हा काँग्रेसची परिस्थिती नेमकी काय आहे हे अवगत होण्यापासून पटोले देखील दुरावले आहेत. एकेकाळी केंद्र व राज्यात सत्तेवर असलेल्या काँग्रेसने नाशिक जिल्हा परिषद व महापालिकेची सत्ता स्वबळावर उपभोगली. सर्वत्र पक्षाचा बोलबाला असतांना राज्याचे नेतृत्व करू शकणारे नेतेही जिल्ह्याने घडविले. त्यामुळे नाशिक जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला व पक्षात नाशिकच्या नेतृत्वाला मानही दिला गेला. परंतु सत्तेबरोबर येणारी सूज अधिक प्रभावी ठरली व काँग्रेसला अवकळा प्राप्त झाली. त्यामुळेच की काय गेल्या दोन वर्षांपासून शहर काँग्रेसला कायमस्वरूपी ना शहराध्यक्ष मिळू शकला ना ग्रामीण महिला काँग्रेसला जिल्हाध्यक्षाच्या रूपाने नेतृत्व.
नाशिक जिल्हा काँग्रेसची सध्याची परिस्थिती खरोखरच स्वबळ अजमाविणारी आहे काय याचा विचार करायचा झाल्यास पाच वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व महापालिका निवडणुकीचा करता येईल. जिल्हा परिषदेच्या ७३ जागांपैकी आठ जागा निवडून आल्या व साडेचार वर्षांच्या काळात त्यातील निम्मे सदस्य पक्ष सोडून गेले आहेत. पंधरा पंचायत समितींपैकी एकाही समितीवर काँग्रेसचे वर्चस्व राहिलेले नाही. तर नाशिक महापालिकेत बोटावर मोजण्याइतपत सहा सदस्य सध्या कार्यरत आहेत. सात नगरपंचायती व आठ नगरपालिकांचा विचार करायचा झाल्यास काँग्रेसचे सदस्य शोधण्याची वेळ आली आहे. अर्थातच पक्षाची ही सारी परिस्थिती निवडणुका स्वबळावर लढविल्यावरच समोर आली होती. पक्ष संघटनेच्या बाबतीत बोलायचे झाल्यास पाच वर्षांच्या काळात फक्त जिल्हाध्यक्षपदाची खांदेपालट झाली हाच काय तो बदल. मात्र, नवीन जिल्हाध्यक्षांना अद्यापही जिल्ह्याची कार्यकारिणी घोषित करण्यास मुहूर्त मिळू शकलेला नाही. ओबीसी, आदिवासी, शिक्षक, डॉक्टर अशा विविध संघटनात्मक आघाड्यांची निर्मितीही होऊ शकलेली नाही. अशा साऱ्या नसलेल्या फौजफाट्यासह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला स्वबळावर सामोरे जाण्याची तयारी काँग्रेस पक्ष करीत असेल तर त्यांच्या धाडसाचे कौतुक करावे तेवढे कमी आहेच. कदाचित गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करून एकाच जागेवर विजय व अन्य चार जागांवर दुसऱ्या क्रमांकाची मते घेतल्यामुळे पक्षाची ताकद वाढल्याचा साक्षात्कार स्थानिक नेतृत्वाला झाला असावा व त्यातूनच स्थानिक पातळीवर काँग्रेसची असलेली परिस्थिती पाहून पटोले यांना दौरा करण्याची गरज भासली नसावी असा अर्थ त्यातून काढला तर गैर होणार नाही.