वीज उपकेंद्रावरून वीज वितरण कंपनीमार्फत होणारा वीजपुरवठा कमी दाबाने होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. सदर वीजपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा दोन दिवसांत उपकेंद्राला टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा अजमीर सौंदाण्याचे सरपंच धनंजय पवारांसह शेतकऱ्यांनी दिला आहे.
शेतीपंपासाठी होणारा वीजपुरवठा हा अतिशय कमी दाबाने होत अल्यामुळे पंप जळणे, स्टार्टर चालू न होणे, पाणी कमी उचलणे, केबल जळणे, ट्रान्सफाॅर्मर जळणे अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर त्रस्त झाले आहेत. कांदा पीक काढणीला आले असून पाणीपुरवठा सुरळीत नसल्याने तो आता जळण्याच्या मार्गावर आहे. महावितरणने वीजपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडतील, तसेच उपकेंद्राला टाळे ठोकू, असा इशारा शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीला निवेदनाद्वारे दिला आहे. विजेअभावी पिकांना पाणी देता येत नसल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. महावितरण कंपनीने वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली जात आहे.
निवेदनावर जितेंद्र पवार, तुषार पवार, गोकुळ नंदाळे, राम गायकवाड, दीपक शेवाळे, गोकुळ सोनवणे, रवींद्र पवार, अण्णा आहिरे, भीमा सोनवणे, दत्तू पवार, वसंत शेवाळे, नीलेश पवार, अशोक पवार, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.