नाशिक : गौरी तथा महालक्ष्मींच्या साडी-चोळीच्या माध्यमातून कोट्यवधींचा व्यवसाय साधणाºया कापड व्यावसायिकांना नवरात्री आणि दिवाळीचीही सुवर्णसंधी लाभली आहे. या सण, उत्सवांच्या काळात होणाºया खरेदीमुळे कापड व्यावसायिकांना बसलेल्या जीएसटीच्या धक्क्याची तीव्रताही कमी झाली आहे. मात्र, जीएसटीमुळे यावर्षी साड्यांसह विविध कपड्यांच्या विक्रीत दरवर्षीच्या तुलनेत घट होण्याची शक्यता असली तरी जीएसटीच्या धक्क्यातून सावरण्यासाठी बळ मिळणार असल्याची प्रतिक्रिया कापड व्यावसायिक व्यक्त करीत आहेत. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर महिलांकडून नऊ दिवस विविध नऊ रंगांच्या साड्या वापरण्याची परंपरा आहे. त्यामुळे उच्च उत्पन्न वर्गातील अनेक महिलांकडून वेगवेगळ्या नऊ रंगांच्या साड्यांची खरेदी केली जात असून, यातील काही महिला या खरेदीच्या निमित्ताने दिवाळीची खरेदी करीत असल्याने कापड व्यावसायिकांना बसलेला जीएसटीचा धक्का काही प्रमाणात का होईना कमी झाल्याचे चित्र सध्या कापड बाजारात दिसून येत आहे. कापड बाजारात सध्या काठपदराच्या साड्यांसह पैठणी, सिल्क, सिंथेटीक, ज्यूटच्या पार्टीवेअर, फॅशनेबल साड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. मध्यम वर्गातील व अल्प उत्पन्न गटातील महिलांनी दिवाळीच्या खरेदीला सुरुवात केल्यामुळे कापड व्यवसायात तेजीचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे. गणेशोत्सवात माहेरी आलेल्या गौरी तथा महालक्ष्मींना साडीचोळी करण्यासाठी नाशिककरांनी शहरातील विविध साड्यांच्या दुकानांतून खरेदीवर भर दिल्याने मोठ्या प्रमाणावर उलाढाल झाली होती. त्यानंतर पाठोपाठ आलेल्या नवरात्रोत्सव व दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभत असला तरी मध्यम वर्गातील ग्राहक खरेदी करताना जीएसटीचा विचार करून खरेदी करीत असल्याचे कापड विक्रेत्यांनी सांगितले.
जीएसटी धक्क्यातून सावरण्याचे बळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 12:20 AM