सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथे बिबट्याच्या बछड्याने घरात मच्छरदाणीत झोपलेल्या चिमुरड्यांच्या सोबत रात्रीचा मुक्काम ठोकल्याची घटना घडली आहे. सकाळी जेव्हा चिमुरड्यांसोबत बछडाही बाहेर आला तेव्हा कुटुंबीयांची बोबडीच वळाली. या बछड्याला वनविभागाने ताब्यात घेतले आहे.शेतकरी नंदू बर्डे हे पत्नी व दोन मुलांसह येथे राहातात. सोमवारी (दि.१३) रात्री मच्छरदाणी लावून बर्डे कुटुंब झोपी गेले. मध्यरात्रीच्या सुमारास मनीषा बेर्डे यांना जाग आली. त्या घरा बाहेर आल्या व पुन्हा घरात गेल्या; मात्र घरात जाताना आपल्यासोबत बाहेरून काहीतरी घरात आल्याचा त्यांना जाणवले. परंतु झोपेच्या तंद्रीत त्यांनी दुर्लक्ष केले व त्या पुन्हा झोपी गेल्या. पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास त्यांना जाग आली तेव्हा वाघाचा बछडा मच्छरदानीमध्ये मुलांशेजारी झोपलेला असल्याचे आढळून आले. हे दृश्य पाहताच त्यांच्या अंगाचे कापरेच झाले. यांना आरडाओरडही करता येत नव्हती. प्रसंगावधान राखत सर्व मच्छरदानीच्या बाहेर आले. त्यांनी घराचे दार बंद करून तातडीने गावातील रामकृष्ण गाढवे यांना सदर घटना कळविली. त्यांनी तत्काळ वनपरिमंडल अधिकारी गोरक्षनाथ जाधव यांना फोनवरून बछड्याची बातमी दिली. काही मिनिटात वन कर्मचारी दशरथ निरगुडे, श्रावण निरगुडे, रामदास बगड, मुरलीधर निरगुडे, उल्हास गोडे, संतोष बोडके, बबलू दिवे, फैजाद सय्यद, रेश्मा पाठक, भोराबाई खाडे यांच्यासोबत घटनास्थळी दाखल झाले. ते बर्डे यांच्या घरात गेले त्यावेळीही बछड्या झोपलेलाच होता. कर्मचाऱ्यांनी जाळी टाकून बछड्याला पकडले व घाटनदेवी येथून आणलेल्या पिंज-यात बंदिस्त केले. टाकेद येथे आणल्यानंतर वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केली. जाधव यांनी वरिष्ठ अधिकारी रमेश ढोमसे यांना या घटनेची माहिती दिली.१५ जुलै रोजी तुकाराम खंडू गाढवे यांच्या विहिरीत पडलेल्या बछड्याला बाहेर काढण्यात आले होते. या घटनेच्या तीन दिवसांनंतर बिबट्याच्या मादीचा धामणगाव जवळ एका अनोळखी वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. हा बछडा आईच्या शोधात आला असवा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तसेच गावक-यांच्या सांगण्यावरून अजून एक बछडा या भागात असावा, अशी शंका व्यक्त केली जात आ या परिमंडळात आतापर्यंत धामणगाव परिसरातून तीन, शेणीत येथून तीन, तर टाकेद व पिंपळगाव मोर येथून एक असे ८ बिबटे पकडण्यात आले आहे. वन परिमंडल अधिकारी गोरक्षनाथ जाधव यांनी मागील वर्षी बिबट्यांचे अवयव कातडीची तस्करी करणारे रॅकेट पकडले होते.
चिमुरड्यांच्या मच्छरदाणीत बिबट्याच्या बछड्याने दिली ताणून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 4:19 PM
इगतपुरीतील धामणगाव येथील घटना : वनविभागाने बछड्याला घेतले ताब्यात
ठळक मुद्दे कर्मचाऱ्यांनी जाळी टाकून बछड्याला पकडले व घाटनदेवी येथून आणलेल्या पिंज-यात बंदिस्त केले.हा बछडा आईच्या शोधात आला असवा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे