नाशिक : २००८ पॅटर्नच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना कॅरी आॅन लागू करावा या आणि इतर मागण्यांसाठी छावा मराठा कृती समिती आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी संघटनांनी पुणे विद्यापीठाच्या कार्यालयासमोर धरणे धरून आंदोलन केले. याप्रसंगी दोन्ही संघटनांनी विद्यापीठाच्या कुलगुरुंना निवेदनही पाठविले. त्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या शेवटच्या वर्षात प्रवेश करणारी बॅच ही २००८ पॅटर्नची शेवटची बॅच आहे. त्यानंतर येणाऱ्या बॅचला २०१२ प्रमाणे परीक्षा द्यावी लागणार आहे. जुन्या पॅटर्नच्या विद्यार्थ्यांना नव्या अभ्यासक्रमाशी जुळवून घेणे अवघड जाणार आहे. कॅरी आॅन नसल्याने जुन्या विद्यार्थ्यांना काही विषयांची परीक्षा पुन्हा द्यावी लागेल व काही विषयांना मुकावे लागेल, अशी समस्या सर्वच शाखांच्या विद्यार्थ्यांना असून, त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात पूर्णपणे कॅरी आॅन लागू झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान टळले होते. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात शेकडो विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेले आहेत. त्यांना कॅरी आॅन न मिळाल्यास त्यांचे एक वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे विद्यापीठातूनही कॅरी आॅन पद्धत सुरू ठेवावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या प्रसंगी छावा मराठा कृती समितीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद बोरसे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अतुल घोंगडे, संदीप भवर, बबन बोडके, उमेश भोई, कौशल्य पाटील आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पुणे विद्यापीठ कार्यालयासमोर ठिय्या
By admin | Published: July 26, 2014 12:21 AM