सायखेडा : जिल्ह्यातील अनेक द्राक्ष उत्पादक व इतर शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे प्रकार समोर आले आहे. आगामी खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांची बी-बियाण्यांमध्ये फसवणूक करणाऱ्या कृषी कंपन्या व बोगस बियाणे विक्रेत्या दुकानांवर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येतील.
द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनीही आपली फसवणूक टाळण्यासाठी सजग राहावे. आगामी काळात नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा करंजगावचे माजी सरपंच खंडू बोडके-पाटील यांनी दिला. महाराष्ट्र शासनाच्या कृषी आयुक्तालयांतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्य बियाणे उपसमितीवर बोडके यांची शेतकरी प्रतिनिधी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल निसाका येथे त्यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर बँकेचे चेअरमन दौलतराव कडलग, सचिन वाघ व संचालक मंडळ उपस्थित होते. निफाड तालुका शिवसेनेच्यावतीने माजी आमदार अनिल कदम, नगरसेवक अनिल कुंदे यांच्या हस्ते बोडके यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना शहरप्रमुख संजय कुंदे, नगरसेवक देवदत्त कापसे, संदीप जेऊघाले, विजय धारराव, रतन गाजरे, नंदू निर्भवणे, सुधीर शिंदे, भाऊसाहेब मुरकुटे उपस्थित होते.