नाशिक : शहर व परिसरामध्ये नागरिकांनी शनिवारी (दि.10) कडक निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करत कोरोनाची साखळी खिळखिळी करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे चित्र पाहावयास मिळाले. दिवसभर शहरात सर्वच दुकानांचे शटर डाऊन अन रस्ते सामसूम होते. बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पसरलेला होता. राज्य शासनाच्या शनिवार, रविवारच्या (विकेंड लॉक डाऊन) आदेशाबाबत नागरिकांमध्ये संभ्रमावस्था होती.
एकीकडे शासनाने जीवनावश्यक वस्तु विक्रीला सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत शनिवार, रविवारीही मुभा दिली असली तरी दुसरीकडे शहरात सर्वत्र पोलिसांकडून सरसकट दुकाने बंद करण्याचा खाकीच्या शैलीत तगादा लावला जातत असल्याने नागरिकांनी बहुतांशी भागात जीवनावश्यक वस्तूंची दुकानेही बंद ठेवणे पसंत केले होते. शहरात सकाळपासूनच सर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी गस्त वाढवून उद्घोषणा करत विक्रेत्यांना दुकाने बंद करण्याबाबत सूचना करण्यास सुरुवात केली.
फेरीवाले फळ, भाजी विक्रेत्यांनासुद्धा बहुतांश उपनगरांमध्ये मज्जाव करण्यात आला होता. नागरिकांनाही अत्यावश्यक कारणांव्यतिरिक्त घराबाहेर पडण्यास परवानगी नसल्याचे पोलिसांकडून गल्लीबोळात गस्त करुन उद्घोषनेद्वारे सांगितले जात होते. दिवसभर शहर व परिसरात पोलिस वाहनांचा सायरन घुमत असल्याने नागरिकांनीदेखील घराबाहेर पडणे टाळले. यामुळे सकाळपासून रात्रीपर्यंत मुख्य शहरी भागांसह उपनगरीय परिसरातील रस्ते निर्मनुष्य झाले होते. दवाखाने, मेडिकल, डायग्नोस्टिक सेंटर, जनावरांची दवाखाने वगळता सर्वच दुकाने बंद होती. बहुतांश भागात किराणा दुकानेही व्यापाऱ्यांनी बंद ठेवणे पसंत केले.