नाशिक : हॉलमार्किंगच्या नवीन जाचक अटींना विरोध करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या एक दिवसीय लाक्षणिक संपात शहरातील सुमारे ७००, तर जिल्ह्यात सहा हजारांहून अधिक सराफी व्यावसायिकांचा शंभर टक्के उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
रत्न आणि दागिने उद्याेगावर हॉलमार्किंगबाबत काही जाचक नियम नुकतेच लागू करण्यात आले आहेत. त्या नियमांचा जाच हा सराफी व्यावसायिकांसह सामान्य नागरिकांनादेखील होत असून, व्यवसायावर त्याचा परिणाम होत आहे. त्याशिवाय अन्य बऱ्याच समस्या अद्याप सोडविलेल्या नाहीत. तसेच भारतीय मानक ब्युरोने दागिन्यांच्या शुद्धतेच्या चार प्रमाणित शिक्क्यांमध्ये अचानक बदल करताना ज्वेलरी उद्योगातील प्रमुख संस्थांशी विचारविनिमयदेखील केला नाही. त्याविरोधात दि नाशिक सराफ असोसिएशननेदेखील कडकडीत बंद पाळला. असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे, उपाध्यक्ष प्रमोद चोकसी, सचिव किशोर वडनेरे, योगेश दंडगव्हाळ, मयूर शहाणे, राजेंद्र दिंडोरकर, सुनील महालकर, शाम बिरारी आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी घोषणा देत नवीन नियमावलीचा निषेध केला. या एकदिवसीय लाक्षणिक संपात जिल्ह्यातील सर्व सराफी व्यावसायिकांसह कारागिरांचाही समावेश होता. दरम्यान, सराफांच्या मागण्यांबाबत खासदार हेमंत गोडसे यांनादेखील निवेदन देण्यात आले.
इन्फो
आम्ही ज्वेलर्स आहोत, शासनाचे कारकून नाही
राज्य सराफी सुवर्णकार फेडरेशनकडून राज्यव्यापी लाक्षणिक संप पुकारण्यात आला होता. त्यात नाशिकमध्ये लावण्यात आलेल्या फलकावरील ‘आम्ही ज्वेलर्स आहोत, शासनाचे कारकून नाही’ ही घोषणादेखील परिसरातून जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती. या लाक्षणिक संपानंतरही शासनाने योग्य दखल न घेतल्यास भविष्यात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारादेखील देण्यात आला आहे.
कोट
सराफी व्यावसायिकांनी यापूर्वीच हॉलमार्कचा नियम मान्य केला आहे. मात्र, नवीन नियमावलीतील प्रक्रिया वेळखाऊ आहे. तसेच नगामागे आणि लॉटमागे जीएसटीची अटदेखील जाचक करण्यात आली आहे. त्याशिवाय राज्यात सर्वत्र पुरेशा प्रमाणात हॉलमार्क सेंटर नसल्याने चार-पाच दिवस प्रतीक्षा करावी लागते. या सर्व बाबींच्या विरोधात हा लाक्षणिक संप पुकारला असून, त्याला १०० टक्के प्रतिसाद लाभला.
गिरीश नवसे, अध्यक्ष, दि नाशिक सराफ असोसिएशन
फोटो (२३पीएचजेएयु ७०)
दि नाशिक सराफ असोसिएशनने पुकारलेल्या बंदप्रसंगी अध्यक्ष गिरीश नवसे, उपाध्यक्ष प्रमोद चोकसी, सचिव किशोर वडनेरे, योगेश दंडगव्हाळ, मयूर शहाणे, राजेंद्र दिंडोरकर, सुनील महालकर, शाम बिरारी, आदी.