लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : बागलाण तालुक्यातील रेशन दुकानदार महिलेला सरपंचाने केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ जिल्ह्यातील रेशन दुकानदारांनी पुकारलेला बंद शंभर टक्के यशस्वी झाला असून, नाशिकसह राज्यातील रेशन दुकानदारांना होत असलेल्या मारहाणीच्या घटना पाहता, सरकारने दुकानदारांना संरक्षण द्यावे अन्यथा बेमुदत दुकाने बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, महिला दुकानदारास मारहाण करणाऱ्यास अटक करण्यात आल्याने गुरुवारपासून नियमित दुकाने उघडी राहतील, अशी माहिती रेशन दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती कापसे यांनी दिली.बागलाण तालुक्यातील इंदिरानगर येथे मंगळवारी सदरचा प्रकार घडला होता. गावातील रेशन दुकानदार महिलेने शासनाच्या आदेशानुसार लाभार्थ्यांना ८० टक्के धान्याचे वाटप केलेले असताना गावातील सरपंचाने रेशन दुकानदाराकडे मोफत तांदळाची मागणी केली असता त्यास नकार देण्यात आल्याने सरपंचाने दुकानदार महिलेस मारहाण केली. त्याचबरोबर दुकानातील धान्य स्वत: उचलून नेले. यापूर्वीही त्र्यंबकेश्वर येथे रेशन दुकानदारास माहाण झालेली असल्यामुळे लागोपाठच्या या घटनांमुळे रेशन दुकानदारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे रेशन दुकानदार संघटनेने बंद पाळण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बुधवारी नाशिक शहरासह जिल्ह्यातील २६०० रेशन दुकानदारांनी कडकडीत बंद पाळला. रेशन दुकानदारांच्या या बंदमुळे लॉकडाउनचा सामना करीत असलेल्या गोरगरीब लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित राहावे लागले. अचानक बंद पाळण्यात आल्याने व त्याची कोणतीही माहिती जनतेला नसल्यामुळे बुधवारी नेहमीप्रमाणे धान्य घेण्यासाठी नागरिकांनी रेशन दुकानांसमोर रांगा लावल्या होत्या, परंतु वेळ उलटून गेल्यावरही दुकान उघडत नसल्याचे पाहून त्यांना रिकाम्या हाती माघारी फिरावे लागले.मारहाणप्रकरणी सरपंचास अटक करण्यात आल्याने गुरुवारपासून नियमितपणे दुकाने उघडावी, असे आवाहन निवृत्ती कापसे यांनी केले आहे.------------------------------संपाचा इशारारेशन दुकानदारांवर होत असलेले हल्ले थांबविण्यासाठी शासनाने दुकानदारांना पोलीस संरक्षण द्यावे, त्याचबरोबर दुकानदारांना आरोग्य विम्याचा लाभ द्यावा यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. अन्यथा बेमुदत संपावर जाण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
रेशन दुकानदारांचा कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 10:22 PM