नाशिक : कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएंट उत्तर महाराष्ट्रात आढळल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात निर्बंधांची कठोर अंमलबजावणी करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे. त्यानुसार गर्दीची ठिकाणे नियंत्रित करण्यासाठी काही मार्ग बंद करण्यात येणार असून, बाजारपेठेत उगाच फिरणाऱ्यांना चाप लावण्यासाठी पोलिसांकडून वाहनधारकांची तपासणी केली जाण्याची शक्यता आहे.
नाशिकमधील पॉझिटिव्हिटी रेट पाचपेक्षा कमी असला तरी राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळून येत असल्याने राज्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये असलेले निर्बंध कायम राहणार आहेतच, शिवाय अंमलबजावणी अधिक परिणामकारक करण्यात येणार आहे. त्यामुळे मास्क न लावणाऱ्यांवर सर्वात आधी लक्ष केंद्रित केले जाणार असून, दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
बाजारपेठेत उगाच फिरणाऱ्यांमुळे गर्दी वाढत असल्याची बाब देखील निदर्शनास आल्याने आता गर्दीच्या ठिकाणावर पेालिसांकडून कारवाई केली जाणार आहे. पेालिसांच्या कार्यपद्धतीबाबत पालकमंत्र्यांनी यापूर्वीच्या अनेक बैठकांमध्ये नाराजी व्यक्त करतानाच प्रसंगी बदलीचा इशारा देखील दिला होता. त्यानंतरही पोलिसांकडून फारशी तत्परता दाखविली गेली नाही. आता मात्र गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे.
शहरातील मेन रोड, रविवार कारंजा, पंचवटी बाजार समिती, जुने नाशिक परिरसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. शिवाय बाजारातील गर्दी कमी करण्यासाठी आवश्यक असणाऱ्यांनाच बाजारपेठेत सोडले जाणार आहे. सेामवारपासून याबाबतची कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे.
--इन्फो--
--मॉल्स बंदच राहणार--
गेल्या २१ तारखेला ५० टक्के क्षमतेने सुरू झालेले मॉल्स तिसऱ्या टप्प्यामुळे पुन्हा एकदा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे मॉल्समधील दुकानदारांचा हिरमोड झाला आहे. यापूर्वी बंद असलेल्या आस्थापना यापुढेही बंदच राहाणार आहेत.
--इन्फो--
दुपारी चारनंतर बंद म्हणजे बंदच
दुपारी ४ वाजेनंतर दुकाने बंद करण्याचा नियम असला तरी अनेक दुकानदार शटर अर्ध्यावर ठेऊन आतमध्ये दुकाने सुरू ठेवत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आलेले आहे. त्यामुळे दुकाने चार वाजेनंतर बंदच ठेवण्याबाबतची अंमलबजावणी करण्यात येणार असून, याबाबतची तयारी करण्यात आलेली आहे.
--इन्फो--
विवाह सोहळे बंद
निर्बंध अधिक कठोर करण्यात येणार असल्यामुळे ४ जुलैनंतर शनिवार आणि रविवारी होणारे विवाह सोहळे आयोजनास बंदी करण्यात आलेली आहे. त्याबाबतच्या सूचना लॉन्स आणि मंगल कार्यालयांना देण्यात आलेल्या आहेत.