नाशिक : शहर व जिल्ह्यात झपाट्याने कोरोना रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. गेल्यावर्षीप्रमाणेच कोरोनाचा कहर सुरु झाल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी प्रशासकीय यंत्रणेच्या प्रमुखांसोबत तत्काळ गुरुवारी (दि.१८) आढावा बैठक बोलविली. या बैठकीत भुजबळ यांनी प्रशासकीय यंत्रणेच्या सर्व खातेप्रमुखांना कोरोनाच्या निर्बंधांची कठोर अंमलबजावणी करण्यावर भर द्यावा, लॉकडाऊन हा उपाय होऊ शकत नाही, कोणीही आपली जबाबदारी झटकून चालणार नाही, असा इशारा दिला.जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु असलेल्या आढावा बैठकीप्रसंगी कृषीमंत्री दादा भुसे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, मनपा आयुक्त कैलास जाधव हे प्रमुख अधिकारी उपस्थित आहे. यावेळी भुजबळ म्हणाले, शहरात तसेच ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची वाढती संख्या चिंतेची बाब आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाच्या सर्वच विभागांना कंबर कसावी लागणार आहे. कोरोनाच्या नियमांची कडक अंमलबजावणीवर भर देणे गरजेचे आहे. लॉकडाऊन नको असेल तर लोकांनी स्वैर वागणे सोडावे, आणि नियमांचे पालन काटेकोरपणे करावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी बोलताना दिला. यावेळी सरकारी यंत्रणांना त्यांनी चांगलेच धारेवर धरले. कोविडविरुध्द लढ्यात सर्वांचा सहभाग आवश्यक आहे, चालढकल किंवा जबाबदारी झटकण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचेही त्यांनी रोखठोकपणे सांगितले. कोविड रुग्णांच्या विलगिकरणाकरिता रुग्णालयांची मदत घ्यावी. दुकानदारांनी जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर ह्यवॉचह्ण ठेवून त्यांची दुकाने बंद करण्याची शिक्षा करावी, जेणेकरुन अन्य व्यावसायिकांनाही धडा मिळेल, असे भुजबळ यांनी सांगितले. लॉकडाऊन हा पर्याय कोणाच्याही फायद्याचा नसून त्याऐवजी नियमांची कडक अंमलबजावणी करण्यावर भर द्यावा. विलगीकरण केंद्र वाढवून नियमांप्रमाणे लसीकरणावर भर द्यावा. जिल्हाधिकारी आदेश काढतात मात्र खालच्या सर्व यंत्रणांकडून त्या आदेशांची अंमलबजावणी होणेही तितकेच गरजेचे आहे, अन्यथा आदेश केवळ कागदोपत्री राहतात, असेही भुजबळ यांनी या बैठकीत अधोरेखित केले. लहान-लहान प्रतिबंधित क्षेत्रे (कन्टेंन्मेंट झोन) तयार करुन घराबाहेर फिरणाऱ्या कोरोनाबाधितांवर कारवाई पोलीस व मनपाने संयुक्तपणे करावी. सर्व प्रशासकीय यंत्रणांनी कोविडविरुध्दच्या या लढ्यात उतरुन युध्दपातळीवर काम करत पंधरवड्यात यश मिळवावे, असे आवाहनही त्यांनी केले.
पोलीस ठाण्यांची वारी घडवून आणाविनाकारण रात्री बाहेर फिरणारे तसेच मास्कविना सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेत पोलीस ठाण्यांची वारी घडवून आणावी. चार ते पाच तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्याची 'शिक्षा' अशा बेजबाबदार वर्तन करणाऱ्या नागरिकांना 'धडा' शिकवून जाईल, असा आशावाद भुजबळ यांनी व्यक्त केला. मास्कचा वापर गर्दीमध्ये सहभागी होणे टाळणे, सामाजिक अंतर राखणे ही त्रिसुत्री नाशिकरांनी काटेकोरपणे पाळणे आवश्यक असल्याचे भुजबळ म्हणाले, तरच आपण लॉकडाऊनचे घोंगावणारे संकट दूर करु शकतो, असे त्यांनी नाशिककरांना उद्देशून सांगितले.