मनोज देवरे
कळवण : कोरोनाच्या अटकावासाठी ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रीट’ या त्रिसूत्रीची कठोर अंमलबजावणी करणाऱ्या कळवण तालुक्यातील नवी बेज गावाला केंद्रीय पथकाने भेट देत ग्रामस्थांचे कौतुक केले. गावातील कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली आणि कोरोनाला अटकाव करण्यात यश आल्यामुळे नवी बेज पॅटर्नची चर्चा जिल्ह्यात आहे.
कळवण तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या नवी बेज गावात ८३ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. कोरोना समिती, ग्रामपंचायत व ग्रामस्थ, आरोग्य यंत्रणेने गाव कोरोनामुक्त होईपर्यंत लॉकडाऊनचा निर्णय घेतला. रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्या केल्या. कळवण तालुक्याच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय पथकाचे सदस्य डॉ साहील गोयल, डॉ. पी. के. वर्मा या द्विसदस्य पथकाने दखल घेऊन नवी बेज गावाला नुकतीच भेट देऊन ग्रामस्थांचे, पदाधिकारी व यंत्रणेचे कौतुक केले. तालुक्यातील नवी बेज गावात २५ मार्चला ४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यानंतर २९ मार्चपर्यंत गावात कोरोनासदृश लक्षणे असलेले नागरिक फिरत असल्याचे कोरोना कमिटीचे अध्यक्ष घनश्याम पवार यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ . राजेश काटे यांना लक्षणे असलेल्या लोकांच्या चाचण्या करण्याबाबत सांगितले .
आरोग्य विभागाने दुसऱ्या दिवशी ३० मार्चला लक्षणे असलेल्यांच्या चाचण्या केल्या असता २४ जण बाधित आढळले. त्यानंतर ग्रामपंचायत, कोरोना कमिटी व ग्रामस्थांनी तातडीने गाव पूर्णत: लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. त्यात कोणालाही घराबाहेर पडू द्यायचे नाही, कोरोना रुग्णाला वेगळ्या खोलीत ठेवायच्या सूचना केल्या. रुग्णांचा ऑक्सिजन, ताप मोजण्याची आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांना सूचित केले. बाहेरच्या व्यक्तींना गावात प्रवेश बंद केला. गावात रोज रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्या सुरू केल्या.
सलग आठ दिवसांत जवळपास ९०० चाचण्या करण्यात येऊन ८५ रुग्ण आढळले. त्यानंतर गावात लॉकडाऊन केल्यामुळे कडक नियमांची अंमलबजावणी केल्यामुळे ११ दिवसात रुग्णसंख्या ५च्या आत आली. पुढच्या काही दिवसांमध्ये गावातील नवीन रुग्णांची संख्या शून्यावर येईल, असा विश्वास घनश्याम पवार यांनी व्यक्त केला .
--------------
अधिकाऱ्यांकडून रुग्णांची चौकशी
यावेळी केंद्रीय पथकाचे सदस्य डॉ. साहील गोयल, डॉ. पी. के. वर्मा यांनी नवी बेज गावात केलेल्या उपाययोजनांची माहिती घेऊन माहिती पडताळणी केली, नवी बेजच्या गृहविलगीकरण असलेल्या रुग्णाच्या घरी जाऊन प्रत्यक्ष रुग्णाला भेटून चर्चा केली. दैनंदिन आरोग्य कर्मचारी भेटी देतात का? ऑक्सिजन तपासले जाते का? औषधं दिली जातात का? याबाबत विचारणा केली. कोरोनाबाधित रुग्णांनी दिलेल्या प्रतिक्रिया व १०० टक्के गाव लॉकडाऊन असलेले बघून समाधान व्यक्त केले. आरोग्यसेविका सुनीता जोपळे, दादाजी गुंजाळ, आशा स्वयंसेविका सुनीता जाधव यांच्याबरोबर पोलीसपाटील केदार, ग्रामविस्तार अधिकारी सुधाकर देशमुख, श्रीकांत पाटील, अशोक वळीनकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश काटे आदींचे कौतुक केले.
----------------------
कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन नवी बेजमधील सर्व ग्रामस्थांनी राबविलेल्या ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रीट या तीन उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी केल्याने गावात महामारी आटोक्यात आली आहे. यासाठी ग्रामपंचायत, आरोग्य कर्मचारी आणि रहिवासी यांचे सहकार्य आहे.
- घनश्याम पवार
अध्यक्ष, कोरोना कमिटी, नवी बेज (१२ कळवण १)
===Photopath===
120421\12nsk_20_12042021_13.jpg
===Caption===
१२ कळवण १