नाशिक : शहराचा सध्या कोरोनाचा मुख्य हॉटस्पॉट पंचवटी व नाशिकरोड परिसर बनला आहे. या भागात दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळून येत असल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे. गुरूवारी (दि.१६) या भागात तब्बल एकदम ६० रूग्ण आढळून आले.जुने नाशिक, वडाळागाव या भागातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या अत्यंत कमी झाली आहे. मागील तीन दिवसांपासून जुन्या नाशकात कोरोनाचा एकपेक्षा अधिक रूग्ण नाही, तशीच स्थिती वडाळागावातील आहे. वडाळागावात सध्या केवळ महेबुबनगर, सादिकनगर हा भाग प्रतिबंधित करण्यात आलेला आहे; मात्र जुने नाशिक परिसरात गुरूवारपासून संपुर्णत: लॉकडाऊन करण्यात आले. या भागातील अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व दुकाने सक्तीने बंद करण्यात आली आहेत. ठिकठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी करत परिसरातील रहिवाशांच्या वर्दळीवर निर्बंध आणले आहे. या भागात ज्याप्रमाणे कोरोनाच्या उद्रेकाची भीती आहे, त्याचप्रमाणे पंचवटीतसुध्दा कोरोनाचा फैलाव अधिक वेगाने होऊ लागला आहे. यामुळे पंचवटी विभागातील दिंडोरीरोड, वाल्मिकनगर, संजयनगर, म्हसरूळ, मखमलाबादरोड परिसर, क्रांतीनगर, फुलेनगर, पेठरोडचा परिसर, दत्तनगर, तपोवनरोड, हिरावाडीसह मुख्य पंचवटीचा भाग तत्काळपणे प्रतिबंधित म्हणून घोषित करत या भागात सक्तीने प्रतिबंधित क्षेत्राच्या सर्व नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करण्याची गरज आहे.पंचवटीमध्ये सातत्याने कोरोनाबाधितांचा आकडा हा मागील महिनाभरापासून आजतागायत वाढता आहे. त्याचप्रमाणे नाशिकरोड भागातसुध्दा कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. या भागातसुध्दा विशेष पथकांद्वारे घरोघरी जाऊन पुढील पंधरवड्यापर्यंत सर्र्वेक्षण मोहीम राबविणे, शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार संशयित व्यक्तींचे नमुने संकलन, बाधित व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींचा कसोशीने शोध आदि उपाययोजना राबविण्याची मागणी होत आहे. तसेच दूध, भाजीपाला, औषधांच्या विक्रीवर कुठल्याही प्रकारचे निर्बंध न आणता अन्य सर्व प्रकारच्या वस्तू विक्रीची दुकाने कटाक्षाने बंद ठेवणे गरजेचे आहे.
पंचवटीमध्येही आज तब्बल ६० रूग्ण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 6:56 PM
या भागात ज्याप्रमाणे कोरोनाच्या उद्रेकाची भीती आहे, त्याचप्रमाणे पंचवटीतसुध्दा कोरोनाचा फैलाव अधिक वेगाने होऊ लागला आहे.
ठळक मुद्दे नियमांची कठोरपणे अंमलबजावणीची गरजनाशिकरोड भागातसुध्दा कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली