सटाणा: जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक यांच्या सूचनेप्रमाणे कोरोना काळात येथील बाजार समितीचे लिलाव कामकाज सोमवारपासून (दि. २४) पूर्ववत सुरू करण्यात येणार असून, शेतकऱ्यांनी त्यासाठी वाहनांची नोंदणी करण्याचे आवाहन बाजार समितीचे सचिव भास्करराव तांबे यांनी केले आहे.
सोमवारी (दि. २४) ५००(ट्रॅक्टर) कांदा लिलावासाठी वाहनाची (ट्रॅक्टर) नोंदणी रविवारी (दि. २३) दुपारी १ वाजेपर्यंत करण्यात येईल. नोंदणी पूर्ण झाल्यावर सदर मोबाईल बंद करण्यात येईल. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना आपल्या मोबाईल नंबरवर मेसेज येईल. सदर मेसेज शेतकऱ्यांनी सोमवारी (दि. २४) लिलावासाठी वाहन घेऊन येताना बाजार समितीच्या गेटवर दाखविल्यानंतरच सोमवारी सकाळी सहा वाजेनंतर बाजार समितीत प्रवेश दिला जाईल. त्या दिवशी शेतकऱ्यांनी सकाळी ६ ते ९:३० पर्यंत वाहन आणावे. नंतर आलेल्या वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. मुख्य प्रवेशद्वारावरून बाजार समिती आवारात प्रवेश करताना वाहनासोबत येणाऱ्या व्यक्तीचा किमान सात दिवस अगोदर केलेला कोरोना चाचणी निगेटिव्ह अहवाल असणे बंधनकारक राहील. कोरोना चाचणी अहवाल नसल्यास संबंधित व्यक्तींना यार्ड आवारात प्रवेश दिला जाणार नाही व बाजार समिती प्रशासनास सहकार्य करावे, ही पद्धत तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचे सचिव तांबे यांनी स्पष्ट केले.