लोकमत न्यूज नेटवर्क
---------
नाशिक : दिवाळीनंतर नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वेगाने वाढू लागली आहे. कोरोना रुग्णसंख्येत अवघ्या काही दिवसांत तब्बल १२०० ने वाढ झाली आहे. अवघ्या पंधरवड्यातील ही वाढ चिंताजनक असून, नागरिकांकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्यास पुन्हा नाईलाजाने कठोर निर्बंध लावावे लागतील, असा संकेतवजा इशारा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आज भुजबळ यांच्या उपस्थितीत आढावा घेण्यात आला यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले. नाशिक जिल्ह्यात सध्या ३,२०० कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. ही बाब चिंताजनक असून, प्रशासनाकडून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने जर अशाच पद्धतीने प्रादुर्भाव वाढत राहिला तर नाईलाजाने पुन्हा एकदा कडक निर्बंध लावले जातील, असे पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले. सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे १० हजार ८०० कोरोनाबाधित रुग्ण होते. मात्र हळूहळू रुग्ण संख्या घटत गेली. नोव्हेंबरमध्ये २,५००च्या आसपास कोरोना रुग्ण आढळून आले. मात्र दिवाळीनंतर पुन्हा रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. तसेच व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याचप्रमाणे ऑक्सिजनबेडवरील रुग्णही वाढत आहेत. रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाकडून सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र, नागरिकांनी खबरदारी घेणे अत्यावश्यक असल्याचेही पालकमंत्री भुजबळ यांनी नमूद केले. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्यासह आरोग्य विभागाचे विविध अधिकारी उपस्थित होते.