शहरातील गॅरेज कारागीर अडचणीत
नाशिक : कठोर निर्बंधांमुळे गॅरेज व्यवसायिकांचे व्यवसाय बंद झाले असून त्यांना विविध आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अनेक कारागीरांना यापासून रोजचा व्यवसाय मिळत असल्याने यावर अवलंबून असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या कारागिरांना मदत देण्याची मागणी होत आहे.
वातावरणातील बदलामुळे गैरसोय
नाशिक : मागील काही दिवसांपासून शहरातील वातावरणात झालेल्या बदलामुळे घरगुती उद्योग करणाऱ्या महिलांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. साधारणत दुपारनंतर पावसाचे वातावरण तयार होत असल्याने या महिलांना सकाळीच कामे उरकावी लागत असल्याने त्यांचा दिनक्रम बदलला आहे.
कमी दाबाने पाणीपुरवठा
नाशिक : शहरातील काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. कमी दाबाने पाणी येत असल्याने महिलांना अनेकवेळा पाण्यासाठी ताटकळत बसावे लागते. महापालिकेने सर्व भागात पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
कोरोना नियमांकडे दुर्लक्ष
नाशिक : शहरातील अनेक लसीकरण केंद्रांवर नागरिकांची गर्दी होत आहे. काही ठिकाणी कोरोना नियमांचे पालन केले जात नसल्यामुळे फिजिकल डिस्टंन्सिंगचा फज्जा उडत आहे. याबाबत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अनेक नागरिक सकाळीच लसीकरण केंद्रांवर रांगा लावतात
गृहविलगीकरणातील रुग्णांसाठी डबे
नाशिक : शहरातील अनेक परिसरात गृहविलगीकरणातील रुग्ण असून ज्या घरांमध्ये एकापेक्षा अधिक रुग्ण आहेत त्यांच्याकडून बाहेरून जेवणाचे डबे मागविले जात आहेत. अशा रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना डबे पोहोचविण्याचा व्यवसाय काही महिलांनी सुरू केला असल्याचे दिसून येत आहे.
पाच राज्यांतील निवडणुकांची चर्चा
नाशिक : पाच राज्यांत झालेल्या निवडणुकांच्या निकालाची शहर परिसरात चर्चा होत आहे. समाजमाध्यमांवरही याबाबत वेगवेगळे संदेश पाठविले जात आहेत. यावरून विविध आडाखेही बांधले जात असून राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये याबाबत वेगवेगळे मतप्रवाह असल्याचे दिसते.
ॲलोपॅथीबरोबरच इतरही पॅथींचा अभ्यास
नाशिक : कोरोना रुग्णांवर ॲलोपॅथीबरोबरच इतरही पॅथींव्दारे उपचार करण्याबाबत अनेक डाॅक्टरांकडून अभ्यास सुरू आहे. काही डॉक्टर ॲलोपॅथीला इतर पॅथीची जोड देऊन उपचार करत असून त्याचा अभ्यासही करीत आहेत. काही ठिकाणी या प्रयोगांचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.