घोटी : इगतपुरी तालुक्यातील घोटीत शनिवारी आठवडे बाजार व रविवार असे दोन दिवस बंदचा निर्णय ग्रामपालिकेच्यावतीने घेण्यात आल्याने घोटीकरांकडून शनिवारी (दि.१३) कडकडीत बंद पाळण्यात आला. नागरिकांनीही सुरक्षितता बाळगून कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सहकार्य करण्याची अपेक्षा ग्रामपालिका व पोलीस प्रशासनाने केली आहे.घोटीत आठवडे बाजाराचा दिवस असूनही ठरल्याप्रमाणे सर्वच दुकानदार व व्यापारी बांधवांनी बंदमध्ये सहभाग घेतला. अत्यावश्यक सेवेमध्ये हॉस्पिटल, मेडिकल, किराणा दुकाने, भाजीपाला, सेवा सुरू होत्या, अन्य साहित्याची दुकाने बंद होती. स्थानिक नागरिकांनी या बंदला सकाळपासूनच सकारात्मक प्रतिसाद दिला. रविवारी (दि.१४) घोटी शहरात संपूर्णतः बंद पाळणार असून, हे दोन दिवस बंद पाळून सोमवारी सकाळी ७ ते संध्याकाळी ७ पर्यंतच्या वेळेत सर्व दुकाने पूर्ववत सुरू होणार आहेत.याबरोबरच ग्रामपालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकान्वये १५ मार्चपासून घोटी परिसरातील होणारे लग्न समारंभ घोटी ग्रामपालिका व पोलीस स्टेशनच्या परवानगीनेच करावे लागणार असून, त्या लग्नाची मुहूर्तवेळ सकाळी ७ ते संध्याकाळी ७ वेळेतच असावी, असे आदेश पत्रात नमूद केले आहे. १५ मार्चपासून राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम उत्सव पूर्णतः बंद ठेवण्यात येतील. याबरोबरच घोटी गावातील धार्मिक स्थळे सकाळी ७ ते संध्याकाळी ७ या वेळेतच खुली राहतील.
तालुक्यात २६ ॲक्टिव्ह रुग्णइगतपुरी तालुक्यातून २६ ॲक्टिव्ह रुग्ण असून, त्यामध्ये घोटीतील ७ रुग्णांचा समावेश आहे. सद्यस्थितीत तालुक्यातील रुग्ण कमी असले तरी रुग्णांची वाढ झपाट्याने होत असल्याने आरोग्य यंत्रणा पुनः सतर्क झाली असून, कोविड आयसोलेशन सेंटर नव्याने सुरू करण्यात आले आहे.शनिवार आठवडी बाजार बंदला उत्तम प्रतिसाद लाभला असून, नागरिकांचे असेच सहकार्य लाभल्यास घोटीला कोरोनापासून लांब ठेवण्यामध्ये मोठा हातभार लागणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे ग्रामपालिका काटेकोर पालन करत असून, सर्वांनी सहकार्य करावे.- रामदास भोर, उपसरपंच, ग्रामपालिका, घोटी.