सर्वतीर्थ टाकेद : गावातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर गावात जनता कर्फ्यू पाळण्यात येत असून त्यास ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन सरपंच ताराबाई बांबळे, उपसरपंच रामचंद्र व सर्व ग्रा.पं. सदस्य यांनी स्वत: गावात फिरून ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून दवंडीद्वारे केले आहे.प्राथमिक आरोग्य केंद्र खेडमार्फत आरटी-पीसीआर चाचण्या करण्यासाठी पथक आले तरी जनतेचे सहकार्य मिळत नाही. मास्क वापरा व सुरक्षित अंतर ठेवा, असे सांगूनही नियमांचे पालन होत नाही. परिसरातील बाजारपेठेचे गाव असल्याने दररोज हजारो माणसांची ये-जा व खरेदी-विक्री चालू असते. या सर्व बाबींचा विचार करत ह्यब्रेक द चेनह्ण या शासनाच्या संदेशाचा उपयोग करून टाकेद गावात २१ एप्रिलपर्यंत कडकडीत बंद पाळला जाणार असून नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करणार असल्याचे ग्रामपंचायतीतर्फे सांगण्यात आले.ग्रामपंचायतच्या आदेशानुसार गावातील माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षकांना पाच दिवस मुख्य रहदारी, बाजार तळ प्रवासी थांबे ठिकाणी ड्युट्या लावल्या असून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसोबत विनामास्क व विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. यासोबतच अंगणवाडी सेविका व मदतनीस, आरोग्य सेविका व आशा वर्कर्सही या बंद काळात मदत करणार आहेत. तसेच ग्रामपंचायतने सॕॅनिटायझर उपलब्ध करून दिल्यानंतर ते प्रत्येक सदस्याने आपल्या वॉर्डात अंगणवाडी सेविका व आशा कर्मचारी यांचे समवेत वाटप केले आहे.
टाकेद गावात कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 5:12 PM