नाशिक : राष्ट्रीयीकृत बँकांच्या खासगीकरणाविरोधात युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने शनिवार व रविवारच्या सुट्टीला लागून सोमवार (दि.१५) पासून पुकारलेल्या दोन दिवसीय संपामुळे सलग चार दिवस बँका बंद राहिल्याने जिल्हाभरातील हजारो कोटींचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले. उद्योगधंद्यातील मोठ्या उलाढाली या संपामुळे होऊ शकल्या नाहीत. त्याचप्रमाणे सर्वसामान्य ग्राहकांनाही आर्थिक व्यवहारांमध्ये विविध अडचणींचा सामना करावा लागल्याचे दिसून आले.
नाशिक जिल्ह्यातील सुमारे तीन हजारांहून अधिक कर्मचारी या संपात सहभागी झाले असून विविध बँकांच्या जवळपास साडेतीनशेहून अधिक शाखा बंद राहिल्याने शहरासह ग्रामीण भागातील व्यवहारही ठप्प झाले. शनिवार, रविवारच्या सुट्टीनंतर सोमवार, मंगळवार हा संप असल्याने सलग चार दिवस बँकांचे कामकाज बंद राहिल्याने बुधवारी बँका उघडताच ग्राहकांची गर्दी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ‘यूएफबीयू’ ही बँक कर्मचारी संघटनांची शिखर संस्था असून एआयबीइए , एआयबीओसी, एनसीबीइ , एआयबीओए , बीईएफआय, ईएनबीआएफ, आयएनबीओसी, एनओबीडब्ल्यू आणि एनओबीओ या नऊ संघटनांनी युनायटेड फोरम ऑफ बँक या संघटनेच्या नेतृत्वात १५ आणि १६ मार्च रोजी संपाची हाक दिली होती. या संपात नाशकातील बँक कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, बँक कर्मचाऱ्यांनी विविध शाखांसमोर तसेच शासकीय व निशासकीय अस्थापनांसमोर पत्रके वाटून त्यांच्या मागण्या ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला.
इन्फो
बेमुदत संपाचा इशारा
केंद्राच्या प्रस्तावित खासगीकरण आणि निर्गुंतवणुकीच्या योजनेविरोधात निषेध नोंदविण्यासाठी नऊ बँक संघटनांच्या छावणी संस्था युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने (यूएफबीयू) दोन दिवस चालविलेला हा राष्ट्रीय संप मंगळवारी दुसऱ्या दिवशीही संपूर्णतः यशस्वी झाल्याचा दावा संपात सहभागी कर्मचाऱ्यांनी केला. या दोन दिवसांच्या माध्यमातून युनाइटेड फोरम ऑफ बँक युनियनने खासगीकरणाला कडाडून विरोध केला असून सरकारने याविषयी पुनर्विचार न केल्यास अनिश्चित काळासाठी संप पुकारण्याचा इशाराही फोरमतर्फे देण्यात आला आहे.
===Photopath===
160321\16nsk_20_16032021_13.jpg
===Caption===
खासगीकरणाविरोधात आंदोलन करताना बँकेचे कर्मचारी व अधिकारी