नाशिकरोड : भारत प्रतिभूती मुद्रणालय येथे होशंगाबाद येथून ट्रकमध्ये कागद घेऊन आलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानाने एका युवतीची छेड काढल्याच्या कारणावरून नागरिकांनी बेदम चोप दिल्याची घटना घडली.भारत प्रतिभूती मुद्रणालयासमोरून कोठारी कन्या शाळेच्या रस्त्यावरून गेल्या गुरुवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास एक युवती मोबाइलवर बोलत चालली होती. यावेळी होशंगाबाद येथून एका ट्रकमध्ये कागद भरून भारत प्रतिभूती मुद्रणालयात पाठविण्यात आले होते. त्या ट्रकसोबत बंदोबस्ताला असलेला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा जवान काहीतरी कामानिमित्त जेलरोड येथून येत होता. त्याने रस्त्याने एकट्या चाललेल्या युवतीला पत्ता विचारण्याचा बहाणा करत तिची छेडछाड केली. सदर युवतीने आरडाओरड केल्यानंतर येणारे-जाणारे नागरिक थांबले व त्यांनी त्या जवानाला चांगलाच चोप दिला. सदर बाब भारत प्रतिभूती मुद्रणालयातील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मिटवामिटवी करून जवानास ताब्यात घेतले. नाशिकरोड पोलिसांनीदेखील घटनास्थळी धाव घेतली. मात्र सदर प्रकरण मिटवून घेण्यात आले होते. याबाबत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे अहवाल पाठविल्याचे समजते. (प्रतिनिधी)
छेड काढल्याने कर्मचाऱ्यास मारहाण
By admin | Published: November 28, 2015 10:56 PM