आंदोलन : आज ठेकेदारांसमवेत बैठकनाशिक : एकीकडे निवडणुकीची धामधूम सुरू असताना शहर स्वच्छतेचा भार उचलणाऱ्या घंटागाडी कामगारांनी महापालिकेचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवनच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करत आपल्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. ठेकेदारांकडून वेतनात कपात केली जात असल्याची तक्रार कामगारांनी केल्याने आयुक्तांनी त्याबाबत गुरुवारी (दि.१६) ठेकेदारांसमवेत कामगार प्रतिनिधींची बैठक बोलाविण्याचे आदेश दिले आहेत.महापालिकेने दोन महिन्यांपूर्वीच घंटागाडीचा नव्याने ठेका दिलेला आहे. मात्र, सिडको व पंचवटीतील ठेकेदाराकडून करारनाम्यानुसार पूर्ण घंटागाड्या रस्त्यावर न उतरविल्याने त्याविरुद्ध प्रतिदिन दहा हजार रुपये दंडात्मक कारवाई केली जात आहे. दरम्यान, सदर ठेकेदाराने गेल्या दोन महिन्यांचे वेतन अदा करताना कामगारांच्या वेतनातून सुमारे हजार रुपये कपात केल्याने कामगार संतप्त झाले. कामगारांनी त्याविरोधात बुधवारी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी घंटागाडी कामगारांचे नेते महादेव खुडे यांच्यासह काही कामगार प्रतिनिधींनी आयुक्त अभिषेक कृष्ण यांची भेट घेतली. पंचवटी व सिडकोतील ठेकेदाराकडून पूर्ण वेतन अदा न झाल्याची तक्रार कामगारांनी केली, तसेच नाशिक पूर्व, नाशिकरोड व सातपूर येथील ठेकेदारांना महापालिकेकडूनच बिले अदा न झाल्याने कामगारांना वेतन मिळाले नसल्याचे सांगण्यात आले. यावेळी आयुक्तांनी त्याची दखल घेत अतिरिक्त आयुक्त व आरोग्याधिकाऱ्यांना गुरुवारी ठेकेदारांसमवेत कामगार प्रतिनिधींची बैठक घेण्याचे आदेशित केले. त्यानंतर कामगारांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले. त्यानुसार, गुरुवारी (दि. १६) सकाळी ११ वाजता अतिरिक्त आयुक्तांच्या दालनात बैठक होणार असल्याचे महादेव खुडे यांनी सांगितले. वेतनात कपात केल्याप्रकरणी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करणारे घंटागाडी कामगार.
वेतनात कपात केल्याने घंटागाडी कामगारांचा ठिय्या
By admin | Published: February 16, 2017 1:49 AM