कळवण : केंद्र सरकारने नव्याने मंजूर केलेल्या कृषी कायद्यामुळे कृषी व पणन कायद्यात बद्दल झाल्याने शेतकरी व कामगार उदध्वस्त होणार आहेत. सदर कायदा रद्द करावा तसेच राज्य शासनाने माथाडी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांची तातडीने सोडवणूक करावी या मागण्यांसाठी कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीतील माथाडी कामगारांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करुन राज्य सरकार व प्रशासनाचे लक्ष वेधले. दरम्यान, या बंदमुळे कळवण बाजार समितीची सुमारे दीड कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याचे सूत्रांनी सांगितले.महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारल्याने बाजार समितीमध्ये कांदा व धान्याचे लिलाव बंद होते. केंद्र सरकारने कृषी व पणन कायद्यात केलेले बदल व नवीन कायद्यामुळे शेतकरी व कामगारांचे नुकसान होत आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कामगारांच्या वारसांना शासनाकडून आर्थिक सहाय्य मिळावे, माथाडी सल्लागार समितीची पुनर्रचना करावी, माथाडी मंडळावर नोंदीत माथाडी कामगारांचे प्रतिनिधित्व द्यावे यासह विविध मागण्यांसाठी हा लाक्षणिक संप पुकारण्यात आला होता.
कांदा-बटाटा, भाजीपाला, फळे हा शेतमाल सरकारच्या पणन विभागाने बाजार समितीच्या नियमनातून मुक्त केला आहे. त्यामुळे माथाडी कामगारांचे नुकसान होत असल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला. या आंदोलनात भिला काकुलते, गोरख, देवरे, योगेश पवार, सूरज पगार, ललित काकुलते, गिरीश पवार, लखन, कदम, नंदू आहेर, कडू, देवरे, दिलीप जाधव, मनोज आहेर, शशी पवार,योगेश बागुल, दीपक केदारे, रावसाहेब आहेर, संजय पवार, केवळ निकम, राकेश काकुलते, श्रीराम जाधव, प्रकाश रौदल, विजू देवरे, सोनू पगार, सोनू जाधव यांसह माथाडी कामगार सहभागी झाले होते.