निफाड : गोदावरीच्या पुराचे पाणी ओसरल्यानंतर प्रशासनाने गुरुवारी व शुक्रवारी चांदोरी, सायखेडा येथे पुराचा फटका बसलेल्या भागात युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम केले.निफाडचे प्रांत शशिकांत मंगरु ळे यांनी तहसीलदार भामरे, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांच्या समवेत तहसील, पंचायत समिती, आरोग्य, पशुवैद्यकीय, सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी, सर्कल, तलाठी यांच्यासह इतर विभागांची बैठक घेऊन पूरग्रस्त भागात ढासळलेली व्यवस्था दुरुस्त करण्याबाबत सूचना दिल्या. गेल्या तीन दिवसांपासून गोदावरीच्या पाण्याखाली असलेल्या सायखेडा येथील जुन्या पुलावरचे पाणी बुधवारी रात्री ओसरल्यानंतर चांदोरी ते सायखेडा वाहतूक सुरळीतपणे सुरू झाली. परंतु हा पूल जुना असल्याने गुरु वारी या पुलावरून जड वाहनांना बंदी घालण्यात आली. गेल्या तीन दिवसांपासून या पुलावरून वाहतूक बंद होती. गुरु वारी सायखेडा येथील आठवडे बाजार असल्याने बाजारासाठी येणारी वाहने व इतर वाहनांची या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. त्यात पुराच्या पाण्यामुळे चांदोरी ते सायखेडा रस्त्यावर पूर्ण चिखल झाल्याने दुपारी १ वाजेच्या सुमारास ५ ते ६ दुचाकी वाहने चिखलामुळे घसरून खाली पडली, तर टोयोटा गाडी घसरून रस्त्याच्या खाली गेली. त्यानंतर पोलीस प्रशासनाने चांदोरी त्रिफुली आणि सायखेडा चौफुली येथे जाळ्या लावून चांदोरी ते सायखेडा रस्ता वाहतुकीला बंद केला. त्यानंतर तहसील व पोलीस प्रशासनाने चांदोरी ते सायखेडा रस्ता साफ केला. हा रस्ता धुण्यासाठी सिन्नर नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाचा बंब मागवण्यात आला. गटविकास अधिकारी पगार यांच्या मार्गदर्शनाखाली हा पूर्ण रस्ता धुऊन चिखल काढण्यात आला. चांदोरी गावात पुराच्या पाण्यात वेढली गेलेली शासकीय कार्यालये, काही घरे, तसेच चांदोरीचे प्राथमिक आरोग्य केंद्र ओझर आणि पिंपळगाव ग्रामपंचायतीच्या अग्निशामक दलाने पूर्ण धुऊन काढली. प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व वैद्यकीय उपकरणे, साधने पुराच्या पाण्यामुळे पूर्ण खराब झाली आहेत. त्यामुळे या केंद्रात सर्व वैद्यकीय यंत्रणा व साधने नवीन उपलब्ध करावी लागणार आहेत. तात्पुरत्या स्वरूपात चांदोरी येथील गोदावरी सोसाटीच्या सभागृहात प्राथमिक आरोग्य केंद्राचे कामकाज सुरू आहे. सिन्नर नगरपरिषदेच्या व लासलगाव ग्रामपंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्यांनी चांदोरी येथे साफसफाई केली. आरोग्याचा प्रश्न उद्भवू नये यासाठी चांदोरी आणि सायखेडा येथे प्रत्येकी पाच-पाच वैद्यकीय पथके नागरिकांची तपासणी करीत होती. तालुक्यातील पुराचा फटका बसलेल्या नागरिकांची आरोग्य तापसणीसुद्धा ही पथके करणार आहेत. गोदावरीच्या पुरात जनावरे वाहून येऊन मृत झाली आहेत. सायखेड्याच्या पुलाला १० ते १२ मृत जनावरे अडकलेल्या अवस्थेत होती. शिवाय या नदीच्या किनारी २५ ते २८ मृत जनावरे आढळली. ही सर्व जनावरे पशुवैद्यकीय विभाग, अग्निशामक दल यांनी जेसीबीच्या साहाय्याने नदीपात्राच्या बाहेर काढण्याचे काम सुरू केले आहे. शुक्र वारीसुद्धा हे काम चालू होते. जिथे सरकारी जागा उपलब्ध असेल तिथे खोल खड्डा करून त्यांना पुरण्यात येत आहे.गुरुवारी सायखेडा येथे निफाड नगरपंचायतचे कर्मचारी व तीन ट्रॅक्टर, सिन्नर नगरपरिषदेचे सफाई कर्मचारी व ट्रॅक्टर, तसेच सिन्नर अग्निशामक दल, पिंपळगाव मार्केट कमिटीचा जेसीबी, निफाड पंचायत समितीचा जेसीबी, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी पूरग्रस्त भागात तसेच सायखेडा येथील पुलाची साफसफाई केली. (वार्ताहर)
सायखेड्याच्या जुन्या पुलावरून जड वाहनांना बंदी
By admin | Published: August 06, 2016 12:19 AM