मुंबई, कोकणात मुसळधार पाऊस सुरु असून उत्तर-मध्य महाराष्ट्राला मात्र अद्याप जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. रविवारी दुपारनंतर शहरात ढगाळ हवामान तयार झाले. साडेचार वाजेच्या सुमारास शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्येही पावसाच्या मध्यम सरींचा वर्षाव सुरु झाला. साधारणत: सहा वाजेपर्यंत पाऊस सुरु होता. या दीड ते पावणे दोन तासांत २.५ मिमी इतका पाऊस पडला. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत पावसाने उघडीप दिली होती. नाशिकसह सर्वच जिल्हे अद्यापही तहानलेले आहे. पावसाने ओढ दिल्याने बळीराजासह सर्वच चिंतेत सापडले आहे. शहरात जोरदार पाऊस होत नसल्याने गंगापूर धरणाचा जलसाठाही आटत असून महापालिका प्रशासनाने आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करण्याचा निर्णयही घेतला आहे. यामुळे आता जुलैच्या उर्वरित दहा ते बारा दिवसांत सर्वदूर जोरदार पावसाची अपेक्षा नाशिककरांकडून केली जात आहे.
--इन्फो---
...या जिल्ह्यांना मुसळधारेचा इशारा
कुलाबास्थित विभागीय वेधशाळेकडून रविवारी वर्तविण्यात आलेल्या पर्जन्यमानाच्या अंदाजानुसार उत्तर-मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ दिला गेला. यामध्ये पुणे, नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये घाट प्रदेशात मुसळधार तर काही ठराविक भागात जोरदार पर्जन्यवृष्टीचा अंदाज वर्तविला गेला आहे. तसेच हवामान विभागाचे प्रमुख के.एस.होसळीकर यांनीही ट्विटरद्वारे उत्तर-मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस होण्याची चिन्हे असल्याचे सांगितले आहे.