नाशिक : राज्यप्राणी शेकरूची कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात चांगली वाढ होत असल्याचे निरीक्षण नाशिक वन्यजीव विभागाने नोंदविले आहे. गतवर्षाच्या तुलनेत यावर्षी शेकरूंची संख्या वाढली असून पंधरा दिवसांच्या प्रगणनेत १४६ शेकरूंची मोजदाद वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली. या दरम्यान, ५४ शेकरूंनी वनकर्मचाऱ्यांना प्रत्यक्षरीत्या दर्शन दिले. राजूर वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या तीन वनपरिमंडळातील जंगलात ही प्रगणना राबविण्यात आली.
नाशिक वन्यजीव विभागाच्या अखत्यारितीतील अहमदनगर जिल्ह्यातील कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य हे शेकरूंच्या अधिवासासाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी राजूर, भंडारदरा वनपरिक्षेत्रांमध्ये शेकरूंच्या प्रगणनेचा उपक्रम वन्यजीव विभागामार्फत राबविला जातो. उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे, सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांच्या आदेशान्वये राजूर वनपरिक्षेत्रांतर्गत वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय पडवळे यांच्या पथकाने येथील काेथळे देवराई, पाचनई, लव्हाळी, कोतुळ, अंबित, कुमशेत या भागांतील जंगलांमध्ये प्रत्यक्ष दिसणाऱ्या शेकरूंसह व त्यांच्या घरट्यांचे निरीक्षण करण्यात आले. एकूण ५४ शेकरूंनी प्रत्यक्षरीत्या दर्शन दिले. चांदा, करंबू, आळीव, करप, जांभूळ, हिरडा, कोभोळ, आवळा, उंबर, गेळ, येहळा, शेंदरी, लोध, गुळचाई, पिंपर, आशिंद, आंबा या झाडांना शेकरूंची पसंती असल्याचे दिसून आले.
...यंदा नवीन घरट्यांमध्ये वाढ
यंदा अभयारण्यात शेकरूंच्या नव्या घरट्यांची संख्या वाढलेली दिसून आली. तसेच गतवर्षी सोडलेल्या जुन्या घरट्यांचा आकडा जास्त होता; मात्र यावर्षी वापरात असलेल्या जुन्या घरट्यांचा आकडा त्या तुलनेत जास्त असून ही दिलासादायक बाब मानली जात आहे. यामुळे शेकरूंचा या अभयारण्यास अधिवास समृद्ध होत असल्याचे मानले जात आहे. गेल्या वर्षी प्रत्यक्षरीत्या केवळ ४७ शेकरू दिसले होते. तसेच नवीन घरटे केवळ १७७ तर जुने वापरात असलेली घरटी १३५ इतकी होती.
..अशी झाली प्रगणनाअभयारण्यातील निश्चित केलेल्या जंगलातील झाडांना क्रमांक देण्यात आले. प्रत्येक झाडावर क्रमांक लिहिला गेला. तसेच जीपीएस रीडिंग घेत शेकरूंचे त्या झाडांवरील अधिवासाबाबतचे निरीक्षण वनपाल, वनरक्षक, वनमजुरांकडून नोंदविण्यात आले. राजूर वनपरिक्षेत्रातील तीनही वनपरिमंडळात सुमारे दहा ते पंधरा दिवस प्रगणना घेण्यात आली. पाच घरटे म्हणजे एक शेकरूचे वास्तव्य याप्रमाणे मोजदाद केली गेली.
प्रगणनेची आकडेवारी अशी..
राऊंड- प्रत्यक्ष दिसलेले - नवे घरटे- जुने घरटे- सोडलेले घरटेकोथळे- ३४------------- १२९------- ८७-------३७
पाचनई- १६-------------१११----------- ७६-------१९अंबित- ०४-------------२०-----------२२---------०५
एकूण = ५४------------२६०----------१८५-------६१