नाशिक : सैन्यदलांनी काळानुरूप बदल स्वीकारत अत्याधुनिकतेकडे वाटचाल केलेली आहे, त्याचे चांगले परिणाम आपल्याला आजच्या काळात दिसू लागले आहेत. त्यातूनच युवा पिढीचे आकर्षण वाढले असून, उच्चपदावर जाण्यासही ते उत्सुक असल्याचे दिसते; पण आण्विक काळात सैन्यदल सक्षमीकरणासाठी प्रबळ नेतृत्व आणि अपार कष्टाची तयारी हवी, हे युवकांनी विसरू नये, असे प्रतिपादन विशेष सेवा पदकविजेते मेजर जनरल मनोज ओक यांनी केले.
सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीतर्फे संस्थापक धर्मवीर डॉ. बा. शि. मुंजे यांच्या १४८ व्या जयंतीनिमित्त रविवारपासून ऑनलाइन व्याख्यानमालेला सुरुवात झाली. ओक यांनी ‘सध्याच्या युगातील लष्करी नेतृत्व’ या विषयावर पहिले पुष्प गुंफले. सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर अध्यक्षस्थानी होते. ओक यांनी डॉ. मुंजे यांच्या दूरदृष्टिकोनातून सैनिकी शिक्षणाची सोय म्हणून भोसला मिलिटरी स्कूल सुरू झाले. त्याचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी असून, त्यांच्याच विचारांचा वारसा संस्था पुढे नेत आहे, याबद्दल आनंद व्यक्त करत पदाधिकाऱ्यांची प्रशंसा केली. सैन्यदलात नेतृत्वगुण आणि रणनीती ही महत्त्वाची असून, या क्षेत्रात भारताचा दबदबा असल्याचे त्यांनी नमूद केले.
अध्यक्ष लेफ्टनंट जनरल शेकटकर यांनी समाजाची एकत्रिकरणाची भावना निर्माण करून ‘वसुधैव कुटुंबकम’ची संकल्पना मांडली. सोसायटीचे सरकार्यवाह डॉ. दिलीप बेळगावकर यावेळी उपस्थित होते. नाशिक विभागाचे कार्यवाह हेमंत देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. अनिरुद्ध तेलंग यांनी स्वागतगीत म्हटले. स्नेहा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. मोहित पुरोहित यांनी आभार मानले. १५ तारखेपर्यंत ही व्याख्यानमाला चालेल. उद्या सोमवारी (ता. १४) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. विजय खरे हे ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संरक्षणविषयक विचार आणि सद्य:स्थिती’ या विषयावर संवाद साधतील.
इन्फो
चौदा देश दाखवतात सामर्थ्य
जागतिक स्तरावर राष्ट्रे आपल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने इतरांसमोर आव्हान निर्माण करू लागली आहेत. १४ देश हे आपले सामर्थ्य वेगवेगळ्याद्वारे दाखविताना दिसतात. त्यात रशिया, चीन, ब्रिटन, अमेरिका, इस्रायल, पाकिस्तान, कोरियासारखे देश पुढे आहेत. इराणसारखा देश तर सॅटेलाइट कंट्रोलसह ड्रोन वापर, अशा बाबींना प्राधान्य देत आपले साम्राज्य उभे करू लागला असल्याचेही त्यांनी नमूद केले.
फोटो
१२ओक