नाशिक : मागील दहा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दणक्यात ‘कम बॅक’ केले. सायंकाळपासून शनिवारी (दि.२०) सकाळी आठ वाजेपर्यंत शहरात २२.२ मिमी इतका पाऊस झाला. या हंगामात अद्याप ४०५.४ मिमीपर्यंत पाऊस पडला आहे. अद्याप जुलैचे दहा दिवस शिल्लक असून पावसाची शक्यताही वर्तविली जात आहे. त्यामुळे मागील वर्षाचा जुलैपर्यंतचा हंगामी पावसाचा आकडा ४३०.१ ओलांडला जाऊ शकतो. गेल्या वर्षी जुलैच्या ३१ दिवसांत २८४.१ मि.मी इतका पाऊस झाला होता. यावर्षी या वीस दिवसांत २९८मि.मीपर्यत पाऊस पडल्याची माहिती पेठरोडवरील हवामान निरिक्षण केंद्राकडून दिली गेली. त्यामुळे यावर्षी शहरी नाशिककरांना पावसाने अद्याप निराश केले असे म्हणता येणार नाही; मात्र जिल्ह्यात पावसाने निश्चित निराश केले आहेत. अद्याप बहुतांश तालुके कोरडेठाक पडले आहेत.शुक्रवारच्या पावसाने जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली. नाशिक तालुक्यात ३३ मिमी पाऊस पडला तर दुष्काळी तालुका म्हणून जाहीर झालेल्या बागलाण भागातील नागरिकांवर पर्जन्यराजाने अखेर कृपादृष्टी केली असे म्हणणे वावगे होणार नाही. शुक्रवारी बागलाणमध्ये सुमारे १०० मिमीपर्यंत पावसाची नोंद झाली. तसेच सिन्नर तालुक्यातही ५७, देवळ्यात ४६.२, कळवणमध्ये २२ तर चांदवड तालुक्यात ४१ मिमीपर्यंत पाऊस पडला. एकूणच या तालुक्यांमध्ये पावसाची मागील पंधरवड्यापासून कमालीची प्रतिक्षा केली जात होती.गेल्या आठवड्यात त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, नाशिक या तालुक्यांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली होती; मात्र वरील तालुके कोरडेठाक राहिले होते. दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर कोरडेठाक राहिलेल्या तालुक्यांना वरूणराजाने प्राधान्य दिल्याचे दिसून आले. कारण शुक्रवारी इगतपुरीमध्ये २१ तर त्र्यंबकेश्वरमध्ये १८ मिमीपर्यंत पावसाची नोंद होऊ शकली.दरम्यान, शनिवारी (दि.२०) पावसाचा इशारा हवामान खात्याकडून दिला गेला आहे. सकाळी काही प्रमाणात शहरात पावसाने हजेरी लावली. सकाळपासून ढगाळ हवामान शहरात कायम असून सायंकाळी पुन्हा जोरदार वर्षाव होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गंगापूर धरणाचा साठा ५५ टक्क्यांवरगंगापूर धरणाचा जलसाठ्यात शुक्रवारी काही प्रमाणात वाढ झाली. विश्रांतीनंतर पावसाने पाणलोटक्षेत्रात काहीशी हजेरी लावल्यामुळे धरणाचा साठा सकाळी सहा वाजेपर्यंत ५४.७५ टक्के इतका झाला होता. ३ हजार ८३ दलघफूपर्यंत पाण्याची पातळी पोहचली आहे. आज पहाटेपर्यंत गंगापूर धरणक्षेत्रात जवळपास ६०मि.मीपर्यंत पाऊस पडला.