नाशिक : शहर व परिसरात शुक्रवारी (दि.१२) मान्सून सरींनी जोरदार सलामी दिली. हवामान खात्याकडून रविवारपासून जिल्ह्यात पावसाला सुरूवात होईल असा अंदाज वर्तविला गेला होता; मात्र दोन दिवस अगोदरच मान्सूनने शहरात हजेरी लावल्याने आता बळीराजासह नागरिकांना दिलासा मिळाला आहे. महापालिकेने पावसाळापुर्र्व केलेल्या गटारी व नालेसफाईच्या कामांचे पितळ नाशिककरांसमोर उघडे पडले.नाशिक शहरासह जिल्ह्यात किंबहुना राज्यातसुध्दा ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे यंदा मान्सून ७ जून ऐवजी १५ जूनला बरसणार असा क यास हवामान विभागाने लावला होता; मात्र केरळमधून पुढे महाराष्टÑाच्या दिशेने मान्सूनची वाटचाल वेगाने झाली. शुक्रवारी दुपारी तीन वाजेपासून पावसाच्या दमदार सरी शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये कोसळल्या. वाऱ्याचा वेग अत्यंत कमी राहिल्यामुळे टपो-या थेंबांसह जोरदार सरींचा वर्षाव शहरात सुमारे तासभर झाला. शहरात दुपारी दोन वाजेपासून पावसाचे ढग दाटून आले आणि सुर्यप्रकाश पुर्णपणे नाहीसा झाला. काही भागात त्वरित अडीच वाजेपासून पावसाच्या सरींचे आगमन झाले तर काही उपनगरांमध्ये तीन वाजेपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली. साधारणत: तासभर पावसाने हजेरी लावली. यामुळे परिसरातील रस्ते जलमय झाले होते. अनलॉकमुळे व्यावसायिकांनी आपआपली दुकाने सकाळपासूनच उघडली होती. अचानकपणे आलेल्या पावसामुळे काही प्रमाणात व्यावसायिकांसह रस्त्यांवरील लहान विके्रत्यांचीसुध्दा तारांबळ उडाली. पावसाने आपला माल भिजणार नाहीत, याची खबरदारी विक्रेत्यांकडून घेतली जात होती. पाणकापडाच्या सहाय्याने तत्काळ माल झाकून ठेवण्याची विक्रेत्यांची लगबग भद्रकाली, रविवार कारंजा, मेनरोड, शालिमार, पंचवटी, नाशिकरोड या भागात पहावयास मिळाली.पहिल्याच पावसात महापालिकेच्या भुयारी गटार व पावसाळी गटारींची दैनावस्था झाली. महापालिका प्रशासनाने पावसाळापुर्व केलेल्या कामांचे पितळ उघडे पडले. अक्षरश: गटारी रस्त्यांवरून ओसंडून वाहू लागल्याने राजेबहाद्दर लेन, सारस्वत नाला, दहीपूल, कानडे मारूती लेन, भद्रकाली, दुधबाजार, या भागात गटारी रस्त्यांवर अवतरल्याचे चित्र पहावयास मिळाले. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती.
गटारींचे काळेकुट्ट सांडपाण्याचे पाट रस्त्यांवरून ओसंडून वाहत असल्याचे बघून नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पावसाळ्यापुर्व गटारींची स्वच्छता किती चांगल्या पध्दतीने महापालिकेच्या संबंधित विभागाकडून करण्यात आली, याचा पुरावा मान्सूनच्या सलामीने नाशिककरांसमोर आला. त्यामुळे यावर्षीसुध्दा पावसाळ्यात पुन्हा एकदा सराफबाजारापासून तर थेट दहीपूलापर्यंत पाण्याचा तलाव साचणार की काय? अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे.