नाशिक : संपूर्ण जून महिन्यात रुसलेल्या पावसाने जुलैच्या पहिल्या दिवसापासून चांगली हजेरी लावली आहे. शुक्रवारी (दि. ८) मध्यरात्रीपासून सुरू असलेली संततधार शनिवारी दिवसभर कायम राहिली. अधून-मधून काही मिनिटांसाठी उघडीप घेणाऱ्या पावसाचा शनिवारी दुपारनंतर मात्र जोर वाढला होता. शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात १७९ मिलिमीटरची सरासरी ११.९ मिलिमीटर पावसाची नोेंद करण्यात आली आहे. शनिवारी सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू होती. सकाळी १० ते अकरा दरम्यान, काही वेळ उघडीप घेतलेल्या पावसाने नंतर दिवसभर संततधार कायम राखली. पावसाचा जोर कमी-अधिक होत होता. मात्र दिवसभर पावसाची रिपरिप कायम राहिली. पावसाने दमदार हजेरी लावल्याने जिल्ह्णात खरिपाच्या रखडलेल्या पेरण्यांना वेग आला आहे. जिल्ह्णातील पश्चिम पट्ट्यात भाताच्या आवण्यांना सुरुवात झाली असून, नागली, वरईचीही लागवड मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. पावसाची अशीच हजेरी कायम राहिल्यास आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्णातील खरिपाच्या शंभर टक्के पेरण्या पूर्ण होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. (प्रतिनिधी)
नाशिक शहरात पावसाची दमदार हजेरी
By admin | Published: July 10, 2016 12:28 AM