थंडीच्या कडाक्याचे प्रतिनिधित्व करणारा महिना म्हणून जानेवारी ओळखला जातो. यावर्षी जानेवारीअखेर थंडीचा कडाका अधिक राहणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहे. मागील आठवड्यात किमान तापमानाचा पारा थेट १८.४ अंशापर्यंत स्थिरावत होता. मात्र, आता पुन्हा घसरण होण्यास सुरुवात झाली आहे. २० तारखेनंतर नाशिककरांना थंडीची तीव्रता जाणवेल, असा अंदाज हवामान खात्याकडून गेल्या रविवारी वर्तविला गेला होता. यानुसार गुरुवारी किमान तापमान घसरले आणि शहरात थंडी जाणवली. मागील अनेक महिन्यांनंतर पुन्हा राज्यात सर्वाधिक नीचांकी तापमान नाशिकमध्ये नोंदविले गेले आहे.
मागील १० वर्षांमध्ये जानेवारीत नाशकात मोठ्या प्रमाणात किमान तापमानाचा पारा घसरलेला दिसून येतो. यावर्षी लहरी निसर्गामुळे जानेवारीचा पंधरवडा उलटूनही थंडीची तीव्रता वाढल्याचा अनुभव नाशिककरांना येत नव्हता; मात्र महिन्याच्या अखेरचा आठवडा सुरू होत असताना आता पारा घसरण्यास सुरुवात झाली आहे. हळूहळू दिवसा व रात्रीसुद्धा आकाश निरभ्र राहण्यास सुरुवात होऊ लागल्याने किमान तापमानात आता घट होत आहे. प्रजासत्ताक दिनानंतर पुढील काही दिवस शहरात थंडीचा कडाका अनुभवयास येऊ शकतो, असे पेठ रोडवरील हवामान निरीक्षण केंद्रप्रमुख सुनील काळभोर यांनी सांगितले.
---इन्फो---
उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरी गतिमान
उत्तरेकडून येणारे वारे हे थंड असून, या वाऱ्यांचा वेग हा दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे दिल्लीमार्गे मध्य प्रदेश व महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या शीत लहरींचा परिणाम हवामानावर होत आहे. उत्तरेचे थंड वारे आणि रात्रीच्या सुमारास दक्षिण-पूर्वेकडील वाहणारे वारे यामुळे थंडीची तीव्रता येत्या काही दिवसांत उत्तर महाराष्ट्रात वाढण्याची दाट शक्यता आहे. गेल्या आठवड्यात विदर्भामधील गोंदियामध्ये सर्वाधिक थंडी जाणवत होती; मात्र या आठवड्यात थंडीची वाटचाल उत्तर महाराष्ट्राकडे होताना दिसत आहे.
-