सटाणा : बागलाणचा पूर्वभाग आणि काटवन परिसर हा तसा कायमस्वरूपी टंचाईग्रस्त. मोसम, आरम, करंजाड, गिरणा खोरे पाण्याचे आगार म्हणून सर्वदूर परिचित. मात्र सलग दोन वर्षांपासून होणारा अपुरा पाऊस.. त्यातच पाण्यासारखा पैसा खर्च करूनही बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजना.. यामुळे यंदा भरपावसाळ्यातच बागलाण टॅँकरच्या फेऱ्यात सापडला आहे. आजच्या घडीला तालुक्यात एकवीस गावांना बावीस टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. हा शासकीय आकडा असला तरी, तालुक्यातील टंचाईचे वास्तव चित्र त्यापेक्षाही भयावह आहे. या टंचाईत अजून मार्च महिना काढायचा आहे. आगामी एप्रिल, मे महिना काढायचा कसा? या विवंचनेत सध्या बागलाणकर दिसत आहेत.बागलाण तालुका तसा विविध नैसर्गिक साधनसंपदेने नटलेला परिसर. सह्याद्री पर्वत रांगेत येणाऱ्या हा तालुका एकेकाळी पाण्यासाठी स्वयंपूर्ण होता. मोसम, आरम, गिरणा, हत्ती, कान्हेरी आणि करंजाडी या नद्यांमुळे हा परिसर सुजलाम् सुफलाम् होता. पाण्यामुळे या सहाही नद्यांचे खोरे उसाचे आगार म्हणून ओळखले जाते. मात्र कालांतराने निसर्गाचा लहरीपणा, पडणारा अपुरा पाऊस, पाण्याचा बेसुमार उपसा, अपुरे सिंचन प्रकल्प यामुळे पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण असलेला बागलाण टॅँकरच्या फेऱ्यात सापडल्याचे आजचे वास्तव आहे. बागलाण तालुक्यातील पूर्व आणि काटवन परिसरात सिंचन प्रकल्पांचा अभाव असल्यामुळे येथील नागरिकांसाठी पाणीटंचाई पाचवीलाच पूजलेली. तरीदेखील टंचाईवर मात करून या भागातील शेतकऱ्यांनी निर्यातक्षम डाळींबबागा फुलवून आर्थिक सुबत्ता आणली. मात्र त्यावर तेल्या रोगाचे आक्र मण आणि सलग दोन वर्षांपासून होणााऱ्या अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेली पाणीटंचाई या दुहेरी कात्रीत सापडल्यामुळे डाळींबबागा दुष्काळाने होरपळत आहेत. या भागातील सारदे, रामतीर, सुराणे, रातीर, लोणारवाडी, किरायतवाडी, चिराई, राहुड, इजमाणे, बिजोरसे, चौगाव, कऱ्हे, वाघानेपाडा, अजमीर सौंदाणे ही गावे बारमाही टॅँकरग्रस्त आहेत. या गावांची शासन दप्तरी तशी नोंद असली तरी या भागातील बहुतांश गावातील महिलांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत असल्याचे वास्तव आहे.देवळाणे, वायगाव, मळगाव, महड, टेंभे या गावांना आठ आठ दिवस पाणीपुरवठा होत नाही. पाणीपुरवठा योजनांनी आत्ताच तळ गाठल्याने उन्हाळा काढायचा तरी कसा, असा प्रश्न सध्या नागरिकांना भेडसावत आहे.सटाणा तालुक्यातील मोसम, करंजाडी खोऱ्यातील नामपूर, फोपीर, खिरमानी, कुपखेडा, गोराणे, आनंदपूर, आखतवाडे, निताने, करंजाड, पिंपळकोठे या गावांना यंदा भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नामपूर हे ३५ हजार लोकसंख्येचे गाव. मोसमच्या तीरावर वसलेले हे गाव कधीकाळी पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होते. मात्र वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने पाणीपुरवठा योजना कालबाह्य झाल्या. यासाठी शासनाची भारत निर्माण योजनेंतर्गत वाढीव पाणीपुरवठा योजनादेखील मंजूर झाली; मात्र ती योजना अपूर्णावस्थेत असल्यामुळे एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या गावाला टॅँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. @ बागलाण तालुक्यातील सारदे, नामपूर, रामतीर, पिंपळकोठे, इजमाणे, सुराणे, तरसाळी, खिरमानी, बिजोरसे, अजमीर सौंदाणे, चिराई, राहुड, चौगाव, पिंपळदर, रातीर, नवेगाव, कऱ्हे, जामनवाडी, किरायातवाडी, वाघानेपाडा, लोणारवाडी या एकवीस गावांना दररोज बावीस टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. हा पाणीपुरवठा हरणबारी धरण,आराई, ठेंगोडा, लेंडीनाला, रावळगाव येथून केला जात आहे.(वार्ताहर)
सटाण्यात तीव्र पाणीटंचाई
By admin | Published: March 09, 2016 10:37 PM