कॉँग्रेसची जनसंघर्ष यात्रा सत्ताधाऱ्यांविरोधातील रान उठवून तर गेलीच, शिवाय स्थानिक पातळीवरील पक्ष कार्यकर्त्यांना बळही देऊन गेल्याचे म्हणता यावे. कारण, सत्ताधाºयांच्या प्रचार तंत्रापुढे आपला निभाव लागणार नाही, असे दडपण बाळगून असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये या यात्रेमुळे आश्वासकता निर्माण होण्यास मदत झाली आहे.
खरे तर स्थानिक काँग्रेसचे रडगाणे हे कोळसा उगाळावा तितका काळाच, अशा स्वरूपाचे राहिले आहे. नेत्यांच्या आपापसातील वर्चस्ववादामुळे कार्यकर्ते परागंदा झाले आहेत. त्यात कुठल्याच पातळीवरची म्हणजे, केंद्रात, राज्यात, स्थानिक महापालिकेत अगर जिल्हा परिषदेत सत्ता नसल्याने कमालीची मरगळ आलेली होती. पण, अलीकडच्या काळात विविध कार्यक्रम-उपक्रमांच्या निमित्ताने पक्षीय सक्रियता वाढून ही मरगळ झटकली गेल्याचे दिसून येत आहे. जनसंघर्ष यात्रेसाठीही झाडून सारे नेते एकत्र आलेले दिसून आले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेतल्याच्या बाबीचा समाचार घेताना नाशिककरांना ‘बाबाजी का ठुल्लू’ मिळाल्याचे सांगत आक्रमकपणे तोफ डागली, तर दुसरे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राफेलप्रश्नी गोदाकिनारी आमने-सामने चर्चा करण्याचे आव्हान संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांना दिले. स्थानिक प्रश्नांच्या संदर्भाने केली गेलेली टीका जशी लोकाधार मिळवून देणारी ठरली तशी, स्थानिक नेते विनायकदादा पाटील, माजी आमदार जयप्रकाश छाजेड, आमदार निर्मला गावित, माजी खासदार डॉ. प्रतापराव वाघ आदींची यावेळची उपस्थितीही नजरेत भरणारी ठरली. एरव्ही एवढे सारे नेते एकजिनसीपणे पक्षाच्या व्यासपीठावर अपवादानेच आढळत. त्यामुळे सत्ताधाºयांशी संघर्षाचे रणशिंग फुंकणाºया या यात्रेच्या माध्यमातून पक्ष-कार्यकर्त्यांमध्ये आश्वासकतेचे बळ निर्माण झाले नसते तर नवल ! आता ही आश्वासकता टिकवून ठेवता आली पाहिजे. त्यासाठी काँग्रेसचे स्थानिक नेते असेच एकोप्याने राहतात का, हेच बघायचे !