पुरुषोत्तम राठोड
घोटी : एकीकडे ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असे आवाहन केले जात असताना पश्चिम घाट आणि सह्याद्रीच्या डोंगररांगांतील उजाड झालेल्या छोट्या-मोठ्या टेकड्या आणि दऱ्या डोंगर हिरवेगार करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत तर काही समाजकंटक या मोठ्या मेहनतीने लावलेल्या या झाडांना आगी लावत आहेत. परंतु धरणीमाता सेवाभावी संस्थेने या वृक्षांना जीवदान दिले असून रात्रीच्या अंधारात पाईप, नळ्या घेऊन मोबाईल बॅटरीच्या उजेडात संस्थेच्या कार्यकर्त्यांनी झाडांना पाणी देण्याचा उपक्रम राबविला आहे.
प्रसिद्ध अभिनेते व वृक्षप्रेमी सयाजी शिंदे आणि त्यांच्या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून इगतपुरी तालुक्यात काही वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केली होती. परंतु काही समाजकंटकांनी या डोंगररांगांना आगी लावल्या. झाडांना आणि वृक्षांच्या छोट्या रोपांना दिवसाढवळ्या आगी लावून नष्ट करण्यात येत असताना वन विभागाचे त्याकडे दुर्लक्ष झाले होते. परंतु विधायक कामांचा वसा घेतलेल्या धरणीमाता वृक्ष फाउंडेशन या घोटी बुद्रुक येथील सेवाभावी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी झळ बसलेल्या झाडांना मोठ्या कष्टाने पाणी देण्याची मोहीम हाती घेतली. उन्हाची पर्वा न करता तसेच रात्रीच्या अंधारात मोबाईलच्या बॅटरी मदतीने त्यांनी वृक्षांना जीवदान देण्याचे सेवाभावी कार्य पार पाडले आहे.
घोटी शहरालगत असलेला डोंगर वनराईने समृद्ध होण्यासाठी डोंगरावरील माथ्यावर
१६०० फूट अंतरावर पाईप घेऊन जाऊन वृक्षांसाठी पाण्याची व्यवस्था केली होती. परंतु पाईप आगीत जळाल्याने नव्याने पाईपलाईन टाकली आहे. ५०० च्या वर झाडांची लागवड करण्यात आली होती; परंतु वाढत्या उन्हामुळे आणि डोंगराच्या आगीत काही झाडे जळाल्याने उरलेल्या २५० ते ३०० झाडांना जगविण्यासाठी या कार्यकर्त्यांची धडपड सुरू आहे. त्यांना पाणी न मिळाल्यास संपूर्ण वनराई संपण्याच्या मार्गावर होती. डोंगरावरील झाडांची उंची ४ ते ५ फूट झाली असून लवकरच मुंबई-आग्रा महामार्गावरून जाताना हिरवी गर्द वनराई दृष्टीस पडण्याची चिन्हे आहेत.
या डोंगरावर हिरवी चादर आच्छादनासाठी धरणीमाता फाउंडेशनचे तुषार बोथरा, संजय देशपांडे, पूनम राखेचा, विनायक शिरसाठ,राजेंद्र सुराणा, सुधाकर हंडोरे, गणेश काळे, सचिन लोढा, संजय दायमा, विजय देशमुख, परशुराम थोरात, संतोष वाघचौरे, राजेंद्र बोरसे, दामोदर माळी, धीरज गौड यांचे प्रयत्न सुरू आहेत.
डोंगरावरील पाईपलाईनसाठी सरपंच रामदास भोर, घोटी मर्चंट बँकेचे चेअरमन रवींद्र गोठी यांचे योगदान लाभत आहे. इगतपुरी तालुक्यातील निसर्गप्रेमी व्यक्तींनी घोटी शहरासह आजूबाजूचा संपूर्ण परिसर ग्रीन
बनविण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन धरणीमाता फाउंडेशनने केले आहे.
===Photopath===
290321\29nsk_21_29032021_13.jpg~290321\29nsk_22_29032021_13.jpg
===Caption===
घोटी पाईपलाईन~घोटी डोंगर