नाशिक : कोरोनाच्या दोन्ही लाटेत एस.टी. महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसल्याने राज्य शासनाकडून आर्थिक मदत घेण्याची वेळ आली. जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू झाली असल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, अजूनही आंतरराज्य सेवा सुरू झाली नसल्याने प्रवासी वाहतुकीला निर्बंधांचा फटका बसत आहे. नाशिक जिल्ह्यात अजून अशा प्रकारच्या प्रवासी सेवेला परवानगी देण्यात आलेली नाही.
नाशिक जिल्ह्यात अजूनही आंतरराज्य बससेवा सुरू झालेली नाही. सुरत, अहमदाबादसाठी नाशिकमधून बस जात होत्या; परंतु कोरोनाच्या दोन्ही लाटेत येथील बससेवा बंद करण्यात आली आहे. कर्नाटकमधून येणारी बसदेखील आता बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावरील बसदेखील धावत नाही. कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीला बसलेला फटका दुसऱ्या लाटेपर्यंत कायम आहे. जिल्ह्यातील प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. शंभर टक्के वाहतुकीला परवानगी असली तरी अजूनही प्रवाशांची अपेक्षित संख्या नसल्याचे दिसून येते.
--इन्फो--
जिल्ह्यातील एकूण आगार- १३
जिल्ह्यातील एकूण बस- ८६५
सध्या सुरू असलेल्या बस- ४८९
रोज एकूण फेऱ्या- ११००
दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या बस- ००
--इन्फो--
पुन्हा तोटा वाढला
नाशिक विभागाला साधारणपणे दरमहा मिळणारे ३० ते ३२ केाटींचे उत्पन्न जवळपास ८० टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे नाशिक विभागाचा तोटा वाढला आहे. जिल्ह्यातील प्रवासी वाहतुकीचे जाळे व्यापक असले तरी त्यातुलनेत उत्पन्न मात्र घटले आहे. डिझेलच्या दरात वाढ झाल्यामुळे, तसेच प्रवासी घटल्यामुळे तर तोटा अधिकच वाढला आहे.
--इन्फो--
जिल्ह्यालाही मिळेना प्रवासी
बसमधून शंभर टक्के प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. असे असले तरी जिल्ह्यात अजूनही पुरेसे प्रवासी मिळत नसल्याने महामंडळाला अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने तोट्यातच ही सेवा सुरू आहे. एखाद्या तालुक्यात आठवड्यात ज्या दिवशी गर्दी असते अशा दिवशी बसचे वेळापत्रक आखले जात आहे. मागणी लक्षात घेऊन बस सोडल्या जात आहेत.
--इन्फो--
धार्मिक स्थळांवरील बस बंदच
राज्यात अजूनही निर्बंध लागू असल्याने धार्मिक तसेच पर्यटन स्थळे बंदच आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी धावणाऱ्या बसला ब्रेक लागलेला आहे. देवस्थानच्या ठिकाणी सोडण्यात आलेल्या बस अजूनही बंदच असल्यामुळे उत्पन्न देणाऱ्या या बसला फटका बसत आहे. शिर्डी, वणी, त्र्यंबकेश्वर, शनिशिंगणापूर तसेच जिल्ह्यात असलेली धार्मिक स्थळे, तसेच यात्रा-जत्रांच्या ठिकाणी बस सोडल्या जातात. या बस आता बंद आहेत.
--इन्फो--
धुळे, पुणे मार्गावर बऱ्यापैकी प्रतिसाद
नाशिकमधून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना मात्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. धुळे, पुणे, मुंबई, औरंगाबाद, नांदगाव या मार्गांवर धावणाऱ्या बसला सध्या चांगली गर्दी आहे. त्यामुळे या मार्गावरील बसच्या माध्यमातूनच महामंडळाला आर्थिक हातभार लागत आहे. पहिल्या दिवसापासूनच लांब पल्ल्याच्या बसला नाशिकमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुण्याकडे जाणाऱ्या बसचा प्रतिसाददेखील वाढत आहे. खासगी शिवशाहीच्या माध्यमातून सध्या मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक केली जात आहे.