नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवेला ७१ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या ‘वारी लाल परीची’ या उपक्रमांतर्गत भरविण्यात आलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन मेळा स्थानक येथे करण्यात आले.यावेळी औद्योगिक सुरक्षा विभागाचे संचालक डी. आर. खिरोडकर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी विभाग नियंत्रक नितीन मैंद, बस फॉर अस फाउंडेशनचे सदस्य रोहित धिंडे, सयंम धारव, रवी मडगे, तनय दांडेकर आदी उपस्थित होते. त्यांनी प्रदर्शनाची माहिती करून दिली. सकाळी उद्घाटन झाल्यानंतर अनेकांनी प्रदर्शन पाहण्याकरिता गर्दी केली होती. अभिनव विद्यालय, मराठा विद्यालय, पेठे शाळा, सारडा कन्या विद्यालय, रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालय आदी विद्यार्थ्यांनी प्रदर्शनास भेट देवून माहिती घेतली.या प्रदर्शनात राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेत आजवर दाखल झालेल्या बसेसचे लहानसे मॉडेल विद्यार्थ्यांसाठी कौतुका विषय ठरले होते. प्रवाशांच्या सेवेसाठी एस.टी. बसमध्ये वारंवार करण्यात आलेल्या बदलांचा प्रवास या प्रदर्शनातून उलगडण्यात आला.लाल पिवळ्या बसेसपासून ते शिवशाही आणि बसस्थानकांपासून ते बसपोर्ट असा मोठा पल्ला गाठणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा प्रवास या प्रदर्शनातून उलगडणार आहे. या प्रदर्शनात जुन्या बसेसची छायाचित्रे, माहिती फलक यातून विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.इतिहासाला उजाळा७० वर्षांच्या इतिहात प्रवासी सेवेत असलेल्या राज्य परिवहन महामंडळाने आपल्या सेवेत अनेक चढ-उतार पाहिले आणि आमूलाग्र बदलही केला. वाढती लोकसंख्या आणि विस्तारलेल्या क्षेत्रात पोहोचताना एस.टी. बसमध्ये कसा बदल होत गेला याविषयीची रंजक माहिती एस.टी.च्या ‘वारी लाल परीची’ प्रवाशांना दिली जात आहे. सदर प्रदर्शन बुधवारी (दि. ३१) मालेगाव येथील नवीन बसस्थानकात सुरू केले जाणार आहे.
‘लाल परी वारी’तून उलगडला एसटीचा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 12:30 AM