पंचवटी : येथील हिरावाडी-मेरी परिसरात शनिवारी (दि.९) संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शासकीय कार्यालयाच्या संरक्षक भिंतीवर चक्क बिबट्याने ठिय्या दिला. बिबट्याची रुबाबदार बैठक काही धाडसी नागरिकांनी मोबाइलच्या कॅमेºयात टिपली. काही वेळेतच सदर छायाचित्र सोशल मीडियावरून व्हायरल झाले. त्यानंतर वनविभाग खडबडून जागे झाले आणि ‘रेस्क्यू’ पथक घटनास्थळी पोहोचले.बिबट्याचे भिंतीवरील बैठकीचे फोटो वनविभागापर्यंत पोहचल्यानंतर तत्काळ वनरक्षक, वनपालांच्या ‘रेस्क्यू’ पथकाने मेरी परिसरातील हायड्रो भागात धाव घेतली. या परिसरात गेल्या पाच ते सहा दिवसांपूर्वी हिरावाडीतील पाटाजवळ काही नागरिकांनी बिबट्या बघितला होता. परिसरात बिबट्याचा वावर असल्याने नगरसेवक रूचि कुंभारकर, पप्पू माने यांनी वनविभागाला कळवून परिसरात पाहणी क रण्याची मागणी केली होती. यानंतर वनरक्षक उत्तम पाटील, खैरनार आदींनी घटनास्थळी जाऊन नागरिकांशी संवाद साधत परिसरात सकाळ-संध्याकाळ गस्त केली; मात्र योग्य परिसर व जागा नागरिकांकडून समजली नसल्यामुळे बिबट्याच्या वावर असल्याचे नैसर्गिक पुरावे आढळून आले नाही; मात्र शनिवारी सायंकाळी काही नागरिक वज्रेश्वरी पाटकिनारच्या रस्त्याने पायी जात असताना मेरीच्या संरक्षक भिंतीवर बिबट्या बसलेला असल्याचे दिसताच नागरिकांनी पळ काढला. पाटाजवळ असलेल्या भिंतीवर बिबट्या बसलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संजय वानखेडे, ए. पी. आव्हाड आदींनी घटनास्थळी धाव घेतली तसेच सदर बाब वनविभागालाही कळविली. त्यानंतर वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहचले. त्यांनी नागरिकांशी संवाद साधत धीर दिला. रविवारी सकाळी तत्काळ पिंजरा लावण्यात येणार असल्याचे सांगितले.
बिबट्याने दिला संरक्षक भिंतीवर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 1:32 AM