नाशिक : शालेय विद्यार्थ्यांचा अपघात झाल्यास शासनाच्या शिक्षण व क्रीडा विभागाकडून देण्यात येणाऱ्या राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदानाच्या धनादेशाचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे व बांधकाम सभापती मनीषा पवार यांच्या हस्ते वारसांना वाटप करण्यात आले.योजनेंतर्गत मयत विद्यार्थ्याच्या वारसास रक्कम रुपये ७५ हजार, ५० टक्के अपंगत्व आल्यास रुपये ५० हजार व त्यापेक्षा कमी अपंगत्व असल्यास रुपये २५ हजार अनुदान देण्यात येते. नाशिक जिल्हा परिषदेच्या १६ लाभार्थ्यांना रुपये ११ लक्ष ७७ हजार रकमेचे धनादेश वाटप करण्यात आले. या योजनेत तीन प्रकारच्या अपघातांमध्ये अनुदान दिले जाते. त्यात प्राधान्याने शालेय विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास, अपघातामुळे कायमचे अपंगत्व (२ अवयव / दोन डोळे किंवा १ अवयव व १ डोळा निकामी) झाल्यास, तसेच अपघातामुळे कायमचे अपंगत्व (१ अवयव किंवा १ डोळा कायम निकामी) झाल्यास या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सकांच्या प्रमाणपत्रावर विद्यार्थी या योजनेत पात्र ठरतो. सानुग्रह अनुदान वाटपास शिक्षण विभागाचे उपशिक्षणा धिकारी अनिल शहारे, शिक्षण विस्तार अधिकारी दादाजी मोरे व पात्र लाभार्थी पालक उपस्थित होते.
विद्यार्थी अपघात अनुदानाचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 1:17 AM