नाशिक : पुणे विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने घातलेला गोंधळ आणि भाजपापुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नींविषयी केलेल्या वादगस्त विधानाचा निषेध करण्यासाठी छात्रभारतीच्या वतीने शहरात मोर्चा काढण्यात आला. आमदार परिचारक यांचा प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारण्याचा प्रयत्न मात्र पोलिसांंनी हाणून पाडला. पुणे विद्यापीठात भित्तीपत्रक लावण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर अभाविपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. त्यानंतर दिल्ली येथे गुरुमित कौर या युवतीला बलात्कार करण्याची धमकी देण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ छात्रभारती संघटनेच्या वतीने शहरातून हुतात्मा स्मारक, सीबीएस, डॉ. आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय, असा मोर्चा काढण्यात आला. यावेळी अभाविप आणि आमदार परिचारक यांचा निषेध करण्यात आला. परिचारक यांचा प्रतिकात्मक पुतळा तयार करून त्याला ‘जोडे मारा’ आंदोलन करण्यात येणार होते, परंतु पोलिसांनी हा पुतळा जप्त केल्याने पुढील आंदोलन टळले. आंदोलनात छात्रभारतीचे उपाध्यक्ष राकेश पवार, सागर निकम, विशाल रणमाळे, सचिन भुसारे, रोशन वाघ, दीपक देवरे, संविधान गांगुर्डे, निखील गुंजाळ, संतोष वाघ, संतोष अभोरे, समाान बागुल, राम सूर्यवंशी, मंगेश साबळे, स्वाती त्रिभुवन, अर्चना ओवाळे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करताना छात्रभारतीचे कार्यकर्ते.
‘अभाविप’वर बंदी घालण्यासाठंी छात्रभारतीचा मोर्चा
By admin | Published: March 03, 2017 2:00 AM