सिन्नर बसस्थानकात दिवाळीच्या सुट्ट्यानंतर सवलतीचे पास घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी केलेली गर्दी.सिन्नर : दिपावलीच्या सुट्ट्या संपल्यानंतर सिन्नर बसस्थानकात बसचे सवलत पास काढण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. पास काढण्यासाठी विद्यार्थ्यांना ताटकळत उभे राहण्याची वेळ आली असल्याची तक्रार विद्यार्थी व पालकांकडून केली जात आहे.दिवाळीच्या सुटीनंतर सवलतीच्या पासेस घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या रांगा लागताना दिसत आहेत. काही विद्यार्थी आपल्या मित्रांचे पास काढण्यासाठी एकत्र गठ्ठा घेऊन उभे राहतात. त्यांच्यामुळे अन्य विद्यार्थ्यांना रांगेत ताटकळत उभे रहावे लागत असल्याच्या तक्रार आहे. आगार प्रमुखांनी याबाबत लक्ष घालून विद्यार्थ्यांचा त्रास कमी करण्याची मागणी पालकवर्गातून होत आहे.कधी कधी तर रांग कमी दिसते मात्र एकमेकांचे पास घेऊन उभा राहणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिकाऱ्यांकडून पासेस दिले जातात. त्यामुळे अन्य विद्यार्थ्यांचा प्रचंड वेळ वाया जातो. याला सर्वस्वी संबंधित अधिकारीच जबाबदार असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. गर्दीच्या वेळी काटेकोरपणे लक्ष पूरवून विद्यार्थ्यांना विनाविलंब पास कसे मिळतील याकडे आगार व्यवस्थापक अथवा संबंधित अधिकाºयांनी लक्ष देण्याची गरज आहे. ज्यावेळी गर्दी होते, अशा वेळी पासेससाठी जादा कर्मचाºयांची नेमणूक करण्याची जबाबदारी आगार व्यवस्थकांनी घ्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
बसच्या पाससाठी विद्यार्थ्यांच्या रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2019 6:41 PM