नाशिक : सर्वांना मोफत शिक्षण, विनाअनुदान धोरण रद्द करावे यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी छात्रभारती संघटनेने शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ तीव्र निदर्शने करून, मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.सध्या शिक्षण व बेरोजगारीचा प्रश्न गंभीर झाला असून, शिक्षण महाग झाल्याने विनाअनुदानित धोरणामुळे शिक्षकांचे संसार उघड्यावर पडू लागल्याचा आरोपही यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला. केजी टू पीजीपर्यंतचे शिक्षण मुला, मुलींना मोफत दिले जावे, राष्टÑीय उत्पन्नाच्या किमान दहा टक्के खर्च शिक्षणावर करावा, शिक्षणातील विनाअनुदान धोरण कायमचे बंद करावे, शिक्षणाचे कंपनीकरण, खासगीकरण बंद करावे, मराठी व रात्रशाळा बंद करण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा, सच्चर कमिशन आयोगाचा अहवाल लागू करावा, एमपीएस्सी व यूपीएस्सीमार्फत भरल्या जाणाऱ्या रिक्त जागा त्वरित भराव्यात, देशातील अंगणवाडी कर्मचाºयांना वेतन लागू करावा, शिक्षक व नोकर भरती करण्यात यावी, शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणानुसार रोजगाराची हमी सरकारने द्यावी, बेरोजगार युवकांना मासिक भत्ता देण्यात यावा, मागेल त्याच्या हाताला काम मिळावे, शिक्षक व प्राध्यापकांच्या रिक्त जागा त्वरित भरण्यात याव्यात आदी मागण्याही यावेळी करण्यात आल्या. या आंदोलनात राकेश पवार, समाधान बागुल, राम सूर्यवंशी, निवृत्ती खेताडे, सचिन भुसारे, देवीदास हजारे, सदाशिव गणगे आदी सहभागी झाले होते.