पेठ : आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळांमधील दयनीय अवस्था व गैरसोयींचा पाढा खुद्द विद्यार्थ्यांनीच लोकप्रतिनिधींसमोर मांडल्याने शासकीय आश्रमशाळांची दुरवस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.पेठ तालुक्यातील कोहोर शासकीय आश्रमशाळेत सभापती पुष्पा गवळी, उपसभापती तुळशिराम वाघमारे, जिल्हा परिषद सदस्य हेमलता गावित यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. शाळेच्या परिसरात अस्वच्छता तसेच विद्यार्थी वसतिगृहात घाणीचे साम्राज्य यावेळी दिसून आले. स्वच्छता व साफसफाईसाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नेमणूक केली असताना विद्यार्थ्यांना स्वत:च साफसफाई करावी लागत असल्याची बाब निदर्शनास आली. शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांना उत्तम प्रतीचे जेवण मिळावे यासाठी आदिवासी विकास विभाग कोट्यवधी रुपये खर्च करत असताना प्रत्यक्षात मुलांना दाळ नसलेले वरण आणि जनावरांना खाऊ घालावी अशा प्रकारच्या पालेभाज्या दिल्या जात असल्याचे विदारक चित्र पहावयास मिळाले. याबाबत मुख्याध्यापक व अधीक्षक यांच्याकडे विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे ऐकावयास मिळाली. यावेळी श्यामराव गावित, सदस्य पुष्पा पवार, नंदू गवळी, गणेश गवळी, मोहन कामडी, सुरेश पवार यांच्यासह सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)
विद्यार्थ्यांना निकृष्ट जेवण
By admin | Published: April 13, 2017 11:15 PM