नाशिक : नाशिकरोड येथील पुरुषोत्तम विद्यालयात शुक्रवारी (दि. १६) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले. परंतु, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची सध्या परीक्षा असल्याने त्यांनी या कार्यक्रमाला दांडी मारली. त्यामुळे कार्यक्रमाला उपस्थिती दिसावी म्हणून शिक्षकांनी सक्तीने बसवलेल्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात गोंगाट केल्याने त्यांना शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कान पिळणे, पाठीवर, तोंडावर चापटीने मारण्यापासून छडीने मारण्यापर्यंतची शिक्षा दिली. पंतप्रधानांचे भाषण व विद्यार्थ्यांशी संवाद विद्यार्थ्यांनी थेट पुरुषोत्तम विद्यालयात ऐकावा यासाठी ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले. मात्र, पंतप्रधानांच्या प्रश्नोत्तराचा कार्यक्रम हिंदी आणि इंग्रजीतून असल्याने आणि तो अधिक लांबल्याने विद्यार्थ्यांनी सभागृहात गोंगाट केला. त्यामुळे संतप्त शिक्षकांनी छडीचा वापर करून विद्यार्थ्यांना शिक्षा केली. त्याचप्रमाणे काही शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कान पिळून, तर काहींनी पाठीत व तोंडात चापटी मारून विद्यार्थ्यांना शिक्षा केली. विषेश म्हणजे, हा प्रकार सुरू असताना शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव हेही सभागृहात उपस्थित राहून पंतप्रधानांचा कार्यक्रम पाहत होते. परंतु, त्यांच्या उपस्थितीतही काही शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अशाप्रकारे शिक्षा केली. त्यामुळे शिक्षण उपसंचालकांनी एमराल्ड स्कूलमधील प्रकरणानंतर विद्यार्थ्यांना शिक्षा न करण्यासंबंधी काढलेल्या आदेशाला पुरुषोत्तम विद्यालयाच्या शिक्षकांनी केराची टोपली दाखवली असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या गोंधळातही काही विद्यार्थ्यांनी मात्र लक्षपूर्वक पंतप्रधानांचा कार्यक्रम पाहिला आणि या कार्यक्रमातून आम्हाला तणावमुक्त राहून परीक्षा देण्याची प्रेरणा मिळाल्याचे सांगितले.पंतप्रधानांचे भाषण अतिशय प्रेरणादायी होते. त्यांनी सचिन तेंडुलकरचे उदाहरण देऊन समोर आलेल्या परीक्षेला कसे एकाग्र चित्ताने सामोरे जावे हे समजावून सांगितले. त्यामुळे परीक्षेची भीतीच मनातून नाहीसी झाली आहे. - निशांत क्षीरसागर, नववीतील विद्यार्थीपंतप्रधानांनी तणावमुक्त परीक्षा कशी द्यावी याविषयी मार्गदर्शन केले. त्यानी मन शांत करण्यासाठी योगासन करण्याचा सल्ला दिला. योगासनाच्या ज्या आसनात आपल्याला चांगले वाटते त्या आसनाचा नियमित अभ्यास केला तरी तणाव दूर होत असेल तर नक्कीच परीक्षेचे टेन्शन दूर करण्यासाठी योगासने करणे मजेशीर ठरतील. - तेजस पाटील, आठवीतील विद्यार्थी