नाशिक : दहावीची परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर नव्या मूल्यमापन पद्धतीद्वारे दहावीचा निकाल जाहीर झाला असला तरी अद्याप अकरावी प्रक्रियाविषयी विद्यार्थ्यांना स्पष्ट सूचना मिळालेल्या नाही. अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळावरही यावर्षीच्या प्रक्रियेविषयी कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याने अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेविषयी अजूनही अस्पष्टता असून, शिक्षण विभागाने जाहीर केलेली सामाईक प्रवेश प्रक्रिया केव्हा होणार आणि ती ऑफलाईन होणार की ऑनलाईन याविषयी विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे.
अकरावी प्रवेशासाठी नाशिक महानगरपालिका केंद्रीय पद्धतीने ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. त्यासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांकडून निकालापूर्वीच ऑनलाईन अर्जाचा भाग एक भरून घेतला जातो; मात्र यावर्षी परीक्षाच झाल्या नसल्याने निकालाविषयी संभ्रम निर्माण झाला होता. अखेर राज्य सरकारने दहावीचा निकाल तयार करण्यासाठी अंतर्गत मूल्यमापनाची पद्धती जाहीर करून अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. परंतु, आता दहावीचा निकाल जाहीर होऊनही प्रवेश प्रक्रियेविषयी कोणत्याही सूचना नाही. त्यामुळे अकरावीची प्रवेश प्रकिया केव्हा जाहीर होणार याची प्रतीक्षा विद्यार्थ्यांना लागली आहे.
नाशिक शहरात अकरावीच्या प्रवेशासाठी २५ हजार २७० जागा उपलब्ध आहे. त्यात नवीन वर्षात कमी झालेल्या तुकड्या अथवा नवीन महाविद्यालयांची भर पडल्यास बदल होण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप शिक्षण विभागाकडून अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात विभागीय शिक्षण उपसंचालकांना कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नाही. त्यामुळे अकरावीचे प्रवेश नियमित ऑनलाईन पद्धतीने होणार की यातही बदल होणार याविषयी विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
इन्फो
दहावीच्या निकालाची मूल्यमापन पद्धती जाहीर झाली असली तरी अद्याप अकरावी प्रवेशासाठी शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांची व उपलब्ध जागांची नोंदणी प्रक्रिया व ऑनलाईन अर्जाचा भाग भरण्याची प्रक्रिया केव्हा सुरू होणार याविषयी अद्यापही अस्पष्टता आहे. त्यामुळे शहरातील अकरावी प्रवेश प्रक्रियेविषयी स्पष्ट निर्णय जाहीर करण्याची मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून होत आहे.
इन्फो-
शहरात विज्ञान शाखेच्या सर्वाधिक जागा
शिक्षण विभागाने मागील वर्षी शहरात राबविलेल्या ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेनुसार नाशिक महानगरपालिका क्षेत्रात जवळपास ६० कनिष्ठ महाविद्यालये आहे. यातील २५ हजार २७० जागांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. शहरात विज्ञान शाखेच्या सर्वाधिक १० हजार १६० जागांचा समावेश आहे. त्याखालोखाल वाणिज्य शाखेच्या ८ हजार ६०० जागा आहे, तर कला शाखेच्या ४ हजार ९१० व एमसीव्हीसीच्या १३६० जागांचा समावेश आहे.