नाशिक : सकाळपासूनच लालमातीचा चिखल करण्याची विद्यार्थी आणि शालेय शिक्षक-शिक्षकेतरांची सुरू असलेली धावपळ... चिखलाने भरलेले हात आणि खराब होत असलेले शालेय गणवेश सांभाळत... कोणी पाणी आणतंय, कोणी चिखल मळतो, कोणी चिखल मळून तयार झालेले चिखलाचे गोळे कार्यशाळा स्थळावर नेतोय, तर कोणाची विविध झाडांच्या बिया आणून ठेवण्याची घाई सुरू आहे... अशी सगळी लगबग कॅम्प येथील देवळाली हायस्कूल मध्ये घेण्यात आलेल्या सीडबॉल कार्यशाळेत सुरू होती.याप्रसंगी शाळेच्या विद्यार्थ्यांनी कडुलिंब, पळस, करंजी, बाभूळ, आपटा, वड, पिंपळ, हिरडा, बेहडा, आवळा व बेल आदी बारा वन्य वृक्षांच्या अंदाजे वीस हजार बियांचे एकूण दहा हजार सीडबॉल तयार केले.सरस्वती एज्युकेशन सोसायटी संचलित देवळाली हायस्कूलच्या राष्ट्रीय हरितसेना विभागातर्फे सीडबॉल तयार करण्याची कार्यशाळा नुकतीच घेण्यात आली. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी संस्थेच्या सहसचिव श्रीमती अशरफी घडीयली, संस्थेचे सीईओ मनवानी, शाळेचे मुख्याध्यापक हेमंत मोजाड, उपमुख्याध्यापक लतिफा खान, पी. एच. सिदवा ट्रस्ट अंगणवाडीचे कार्यवाह निशांत गटकळ, पर्यवेक्षक शर्मिला वैद्य आदी उपस्थित होते.कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून प्रा. उमेश शिंदे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना सीडबॉल कसे तयार करावेत यासंबंधीचे शास्त्रशुद्ध मार्गदर्शन केले. तसेच प्लॅस्टिकचा जीवनात वापर न करण्याचे व शाडूमातीच्या गणपती मूर्तीच बसविण्याचे आवाहन प्रा. शिंदे यांनी केले. कार्यशाळेत शाळेच्या मराठी व इंग्रजी माध्यमातील एकूण ७०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कार्यशाळेचा समारोप चंद्रकांत अहिरे यांनी आभार प्रदर्शन करून केला.परिसर हिरवागार करण्याचा संकल्पशाळेचे मुख्याध्यापक हेमंत मोजाड यांनी संस्थेच्या अध्यक्ष अल्मित्रा पटेल व सचिव दिलनवाज वारियावा यांचा देवळाली कॅम्प परिसर पुन्हा एकदा हिरवागार करण्याचा संकल्प असल्याचे सांगितले. प्रा. शिंदे यांच्या विद्या सहयोग सोशल वेल्फेअर एज्युकेशन सोसायटीच्या वतीने मुख्याध्यापक हेमंत मोजाड व हरित सेनाप्रमुख किशोर शिंदे यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी तयार केले दहा हजार ‘सीडबॉल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2019 1:06 AM