कळवण : अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने फटाकेमुक्त दिवाळी साजरी करून पर्यावरण रक्षणासाठी करण्यात आलेल्या आवाहनास आर. के. एम. माध्यमिक विद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यंदाच्या दिवाळीत फटाक्यांची खरेदी करण्याऐवजी त्या पैशातून पुस्तके, खेळणी साहित्य खरेदी करण्याचा संकल्प येथील आरकेएम माध्यमिक विद्यालयातील इयत्ता सहावीच्या शेकडो विद्यार्थ्यांनी केला असून, त्यामुळे फटाक्यांवर खर्च होणाऱ्या हजारो रुपयांच्या रकमेची बचत या संकल्पामुळे होणार आहे.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी फटाकेविरोधी अभियान राबविले जात असून, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना फटाकेमुक्त दिवाळी साजरी करून व आपल्या विवेकी कृतीतून विनम्र अभिवादन करण्याचे आवाहन शहर व परिसरातील विविध शाळांमधून अंनिसच्या वतीने करण्यात आले असल्याची माहिती अंनिसचे तालुका कार्याध्यक्ष एल. डी. पगार यांनी दिली. फटाक्यांमुळे होणारे ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषण, अपघाताने भाजणे, आग लागणे, वृद्ध, आजारी, परीक्षार्थी आदि घटकांना होणारा त्रास, फटाका उद्योगात होणारे बालकामगारांचे शोषण आदि बाबींची माहिती असणारे एक पत्रक समतिीच्या वतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचिवण्यात आले असल्याचे यावेळी एल. डी. पगार यांनी यावेळी सांगितले. फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प कळवण येथील आर. के. एम. माध्यमिक विद्यालयातील शेकडो विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी केला असून, या संकल्पात कळवणकर जनतेने सहभाग नोंदवावा व फटाकेमुक्त दिवाळी अभियान यशस्वी करण्याचे आवाहन प्राचार्य एन. पी. पवार यांनी यावेळी केले.आर. के. एम. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात फटाकेमुक्त दिवाळी हे अभियान अंधश्रद्धा निर्मूलन समिती कळवण तालुका यांच्या वतीने राबविण्यात आले. मुलांनी व शिक्षकांनी फटाके न वाजविण्याची व पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली. यावेळी एल. डी. पगार यांच्यासह शिक्षक व शिक्षिका, कर्मचारी उपस्थित होते.
फटाकेमुक्त दिवाळीचा विद्यार्थ्यांचा निर्धार
By admin | Published: October 18, 2016 12:57 AM