लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नीट परीक्षार्थींच्या प्रवेशपत्रावरील परीक्षा केंद्राचा पत्ता संभ्रम निर्माण करणारा असल्याने सुमारे दीडशे ते दोनशे विद्यार्थ्यांना इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावची चक्कर पडल्याने अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी उशीर झाला. यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा आयोजकांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. पेठरोड परीसरातील शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर असलेल्या एकलव्य निवासी शाळेतील परीक्षा केंद्राचा पत्ता एकलव्य रेसिडेन्शिअल स्कूल, मुंढेगाव, गव्हर्नमेंट सर्व्हंट क्वार्टर्स, ट्रायबल कॉलनी असा असल्याने अनेक विद्यार्थी थेट मुंढेगाव येथील शाळेत पोहोचले. त्या सर्वांना संबंधित शाळा १७ वर्षांपूर्वीच नाशिकला स्थलांतरित झाली असल्याचे सांगण्यात आले. हे उत्तर ऐकून विद्यार्थ्यांना धक्काच बसला. परीक्षा केंद्रावर साडेसात वाजता उपस्थिती नोंदविण्याच्या सूचना होत्या, तर दहा वाजता परीक्षा सुरू होणार होती. त्यामुळे विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. त्यांनी कसेबसे मिळेल ते वाहन पकडून पेठरोड परिसरातील एकलव्य निवासी शाळेतील परीक्षा केंद्र गाठले. येथे विद्यार्थ्यांना साडेआठ ते साडेनऊपर्यंतच उपस्थिती नोंदविण्याचा कालावधी असताना सुमारे सव्वादहा वाजेपर्यंत प्रवेश देण्यात आले. परंतु विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काही तास आधी सुमारे ३० ते ४० कि मी अंतराचा फेरा पडला त्यामुळे विद्यार्थ्यांनी व पालकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, परीक्षा केंद्र अधीक्षकांनी उशिरा पोहोचणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची संधी दिल्याने परीक्षा देण्यासाठी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा देणे शक्य झाले.
परीक्षेत विद्यार्थ्यांचा ‘नीट’ गोंधळ
By admin | Published: May 08, 2017 2:07 AM