नाशिक: राज्यातील एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा गोंधळ तीन महिने उलटल्यानंतरही सुरूच असून, अजून प्रवेशाची एकही फेरी पूर्ण झालेली नाही. प्रवेशासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली असून, या याचिकेवर २८ आॅगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. तोपर्यंत प्रवेशप्रक्रियेला स्थगिती असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, राज्यभरातील एमबीए प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाल्याने विद्यार्थी व पालकवर्गातून मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त होत आहे. यावर्षी तंत्रशिक्षण प्रवेशप्रक्रियेत सुरुवातीपासूनच गोंधळ सुरू असून, या गोंधळास सरकारचे शैक्षणिक क्षेत्रातील धरसोडीचे धोरण जबाबदार असल्याची प्रतक्रिया टीका शैक्षणिक क्षेत्रातून उमटत आहे. राज्यातील तंत्र व व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रम प्रवेशप्रक्रि या राबविण्यात ‘सार’ प्रणाली अपयशी ठरल्याने सरकारने विविध तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रिया राबविण्याची जबाबदारी महासीईटी व तंत्रशिक्षण संचालनालयावर सोपविली होती. त्यानंतर एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जाहीर करण्यात आलेल्या जागावाटपावर मुंबईतील स्वायत्त झालेल्या महाविद्यालयांनी जागावाटपात महासीईटीने स्वायत्त दर्जा ग्राह्य धरला नसल्याचे निदर्शनास आणून देत मुंबई उच्च न्यायालयात प्रवेशप्रक्रियेला आव्हान दिल्याने न्यायालयाने नव्याने प्रवेशप्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले. त्यामुळे पहिल्या फेरीत झालेले प्रवेशही रद्द करण्यात आले. पहिल्या फेरीतील प्रवेश रद्द झाल्यामुळे सीईटी सेलतर्फे पुन्हा नव्याने प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी बोगस कागदपत्रांच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्याने प्रवेशप्रक्रियेला स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे एमबीएच्या प्रवेशप्रक्रियेला अतिविलंब होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, वेगवेगळ्या कारणांनी रखडलेल्या एमबीए प्रवेशप्रक्रियेमुळे एमबीएच्या प्रथम सत्रातील परीक्षा आणि प्रथम वर्षातील इंटर्नशीपही लांबण्याची शक्यता निर्माण झाली असून, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या संधी गमविण्याची भीती निर्माण झाली आहे.
एमबीएचे प्रवेश रखडल्याचे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नूकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 5:26 PM