नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त तपोवनात राहिलेल्या आखाडे आणि खालसे यांचे दैनंदिन कामकाज कसे चालते, इतक्या लोकांचा हा भला मोठा परिवार कसा सांभाळला जातो, त्यांच्या रोजच्या भोजनाची व्यवस्था कशी असते? असे अनेक प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडले होते. त्याप्रमाणेच व्यवस्थापन शास्त्राच्या विद्यार्थ्यांचा तर हा अभ्यासाचाच विषय ठरला होता. त्यामुळे शहरातील विविध शिक्षण संस्थांमधील व्यवस्थापन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी साधुग्राममध्ये जाऊन व्यवस्थापनाचे धडे घेतले. साधुग्राममधील आखाड्यांचे कार्य कसे चालते? त्यांच्या अंतर्गत असलेल्या खालशांचे कामकाज नेमके काय आहे? साधूंची जीवनशैली, प्रमुख महंतांचे कार्य, हजारो साधूंच्या भोजनाचे व्यवस्थापन आदिंची माहिती मविप्र संस्थेच्या व्यवस्थापन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी साधुग्राममध्ये भेट देऊन जाणून घेतली. त्यांना अखिल भारतीय श्रीपंच रामानंदीय निर्मोही आखाड्याचे महंत परमात्मादास महाराज यांनी साधूंच्या आखाड्यांमधील व्यवस्थापनासंबंधी माहिती दिली.दरम्यान, महात्मा गांधी शिक्षण संस्थेच्या एमबीए शाखेचे विद्यार्थी तसेच हॉटेल मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थ्यांनीही तपोवनातील इस्कॉन संस्थानच्या खालशाला भेट देऊन त्यांचे व्यवस्थापन जाणून घेतल्याची माहिती प्रा. प्रशांत सूर्यवंशी यांनी दिली. १२0 विद्यार्थ्यांचे विविध तीन-चार गट पाडून धार्मिक संस्थेचे कार्य कसे चालते. फूड, न्यूटेशन, तसेच विविध सेवा देताना कसे करतात याची माहिती घेतली गेली.
व्यवस्थापनच्या विद्यार्थ्यांना साधुग्राममध्ये धडे !
By admin | Published: September 19, 2015 10:24 PM