येवला : उद्योजक होऊन इतरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा राज्याचे उद्योजक सहसंचालक प्रवीण देशमुख यांनी व्यक्त केली. मातोश्री शिक्षण संस्थेच्या येथील मातोश्री तंत्रनिकेतनमध्ये राज्यस्तरीय टेक्नोफेअर ही तंत्रस्पर्धा उत्साही वातावरणात पार पडली. या उपक्रमाचे उद्घाटन देशमुख यांच्या हस्ते झाले.यावेळी ते बोलत होते. स्पर्धेला राज्यभरातून वीसहून अधिक महाविद्यालयांतील सहाशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. प्रमुख अतिथी नगरसेवक रूपेश दराडे उपस्थित होते. राज्याचे उद्योजक सहसंचालक प्रवीण देशमुख म्हणाले, विद्यार्थ्यांनी विविध उद्योग सुरू करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकावे. नवीन कल्पना, तंत्रज्ञान तसेच तंत्रशिक्षण यांची सांगड घालून जास्तीत जास्त उद्योजक कसे तयार होतील यासाठी महाविद्यालयाने प्रयत्नशील राहून विविध स्पर्धांचे आयोजन करावे. अशा स्पर्धांतून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते. मातोश्री तंत्रनिकेतनने आयोजित केलेल्या केलेली ही स्पर्धा विद्यार्थ्यांना चालना देणारी आहे. मातोश्री तंत्रनिकेतन व उद्योग विभाग यांच्या विद्यमाने विद्यार्थ्यांना मोफत उद्योग मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. प्राचार्य गीतेश गुजराथी यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक युगात विविध कलागुणांनी परिपक्व व्हावे या उद्देशाने महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांच्या अंगभूत संशोधनाला चालना मिळते, असे सांगितले.या तंत्रस्पर्धेअंतर्गत मोटो, जीपी, ब्रिज मेनिया, सी कम्पायलेशन, तंत्र प्रश्नमंजुषा, इलेक्ट्रिकल वायरिंग डिझाइन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या स्पर्धकांचा सन्मानचिन्ह तसेच रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. बक्षीस वितरण समारंभाला एसएनडी इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. हरी कुदळ, हरिनारायण, प्राचार्य अनिल कपिले, अनंत जोशी, मातोश्री फार्मसीचे प्राचार्य जयप्रकाश कोकणे उपस्थित होते. सूत्रसंचालन भाविका गायकवाड हिने, तर हेमंत गायकवाड यांनी आभार मानले. (वार्ताहर)
उद्योजक होण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करण्याची गरज
By admin | Published: February 05, 2017 11:53 PM